शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेन असा इशारा दिला आहे. तर दानवेंच्या या इशाऱ्यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. आम्ही सनदशीर मार्गाने पाहणी करतोय, आमच्या मागण्या मांडतोय पण जर सरकार ठिकाणावर येणार नसेल तर शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल.” असं अंबादास दानवेंनी टीव्ही 9 शी म्हटलं होतं.
हेही वाचा : …याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का? – उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल!
यावर अब्दुल सत्तार यांनी “त्यांनी नक्कीच रस्त्यावर उतरायला पाहिजे. रस्त्यावर उतरण्याचीच वेळ आली आहे. ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, शेतकरी, शेतमजूर, गरिबाला मदत करायला पाहिजे होती, ती मदत नाही केली म्हणून तर ही वेळ आली.” असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.
याशिवाय “त्यांच्याकडे जी काही ५५ आमदारांची फौज होती, त्यापैकी केवळ १५ आमदार राहिले आहेत ४० आमदार गेले आहेत. याचंही कुठंतरी चिंतन मंथन करायला पाहिजे. का गेले, कशामुळे गेले? आपण भविष्यात असं वागलो असतो. आता शाखांपर्यंत ते चालले पूर्वी मंत्र्याला, आमदाराला भेटायला वेळ नव्हता. परंतु आता ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे. त्यांनी रस्त्यावर उतरल्यावर थोडा घामा गाळावा, रक्त जाळावं आणि त्यांचा पक्ष मजबूत करावा.” असंही सत्तार यांनी यावेळी बोलून दाखवलं.