Manikrao Koakate : विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. सरकार स्थापन होऊन आता जवळपास २० दिवस झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला असून मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तब्बल एका आठवड्यानंतर म्हणजे २१ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं. मात्र, मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीवर काही नेते नाराज असल्याचंही बोललं जात आहे. यातच खाते वाटप झाल्यानंतर आता महायुतीमधील मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या मंत्र्यांकडे जाणार? तसेच कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या पक्षाकडे जातं? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, त्याआधीच भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मंत्र्यांनी काही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. ‘नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील आपल्याकडेच येणार आहे’, असं सूचक विधान आज एका कार्यक्रमात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे.
हेही वाचा : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
“नाशिक जिल्ह्याचं काम अधिक चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने होईल, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तसेच आता काही काळजी करण्याचं कारण नाही. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील आपल्याकडेच येणार आहे. सर्वांचीही हीच इच्छा आहे. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही बोललो आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यासंदर्भात बोलणार आहे. आमच्या जिल्ह्यालाच पालकमंत्री पद द्या, आम्हाला इकडे-तिकडे असं फिरायला लावू नका. असं आहे आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री पद असल्यानंतर आपल्यालाही बोलता येतं. बाहेरचा पालकमंत्री आपल्याला चालणार नाही आणि त्यामधून जिल्ह्याचा काहीही विकास साधता येणार नाही”, असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.