Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या संदर्भात बोलताना शेतकऱ्यांना सुनावलं होतं. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ‘कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या पैशांनी काय करता?’, असा अजब सवाल कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.

तसेच यावरून विरोधकांनी देखील कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. आज (६ एप्रिल) माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.

माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते?

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना कोकाटे यांनी शेतकऱ्यालाच सुनावलं होतं. ते म्हणाले होते की, “जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्जभरायच नाही. मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.

संजय राऊतांनी कोकाटेंवर केली होती टीका

“माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत. शेतकऱ्यांना दुखवणारी विधाने केली नाही पाहिजे. अजित पवार यांनी प्रफुल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्या सारख्या लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. या तिघांचे भाषण जर तुम्ही ऐकलं तर कॉमेडी शो सुरु केलेले दिसत आहेत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी कोकाटेंवर टीका केली होती.