ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याने सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याने लोक राफेल घोटाळा विसरणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही शिवसेनेने केला.
ख्रिस्तियन मिशेल याने सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली न्यायालयात केला होता. मात्र, हे नाव नेमके कोणत्या संदर्भात घेतले ते उघड करण्यास ईडीने नकार दिला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असले तरी त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने सोनिया गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून लोक राफेल विमान घोटाळा विसरतील असे कुणी समजू नये. असेही शिवसेनेने म्हटले आहे.
सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचेच नामजप होईल असे दिसत असल्याचे अग्रलेखत म्हटले आहे. या ‘बाचाबाची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल?, असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा केला जातो, तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले होते, हा घोटाळा काही हजार कोटींचा आहे व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई असल्याचेही शिवसेनेने नमूद केले. सरकारी यंत्रणा दोनचार लोकांच्या टाचेखाली आहे व राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांत गुंतवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला.