राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय समिकरणं बदलली आहेत. सध्या शिंदे गट-भाजपा यांच्यात युती आहे. तर वैचारिक भिन्नता असलेल्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. असे असतानाच कधीही राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. भाजपाने मुंबई महापालिकेकडे विशेष लक्ष दिले आहे. मुंबई पालिकेवरील उद्धव ठाकरे गटाची सद्दी संपवण्यासाठी भाजपाकडून विशेष रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाकडून ‘जागर मुंबईचा’ मोहिमेच्या माध्यमातून मुंबईत सभांचे आयोजन केले जाणार आहे. यातील पहिली सभा ही वांद्र पूर्व येथे होणार असून त्याची जय्यत तयारी केली जात आहे.
हेही वाचा >>> “सरन्यायाधीशांची ओळख होती म्हटलं की..,” उदय लळीत यांच्या सत्कार समारंभात फडणवीसांचे विधान!
भाजपाचे नेते तथा भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपाच्या या विशेष मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. ‘मतांसाठी तुष्टीकरण सुरू आहे. महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची भलती ‘उठा’ठेव सुरु आहे. त्याविरोधात भाजपाकडून मुंबईकरांसाठी ‘जागर मुंबईचा’ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेतील पहिली सभा ही ६ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वांद्रे पूर्व येथे आयोजित करण्यात येणार आहे,’ अशी माहिती आशिष शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.
हेही वाचा >>> “भविष्यात वेगळं काहीतरी…”, एकनाथ शिंदे-शरद पवारांच्या ‘त्या’ भेटीवरून अमोल मिटकरींचं सूचक विधान!
जागर मुंबईचा या मोहिमेच्या माध्यमातून भाजपाची पहिली सभा वांद्र पूर्व येथे होणार आहे. आशिष शेलार तसेच खासदार पूनम महाजन हे या सभेतील प्रमुख वक्ते असतील. तर आमदार पराग अळवणी यांची या सभेला प्रमुख उपस्थिती असेल.
हेही वाचा >>> नाशिक रेल्वेस्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या मालवाहू डब्याला आग
कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचीच असा चंग भाजपाने बांधला आहे. याच कारणामुळे आशिष शेलार मागील काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेनच्या काळात मुंबई पालिकेत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, असा दावा शेलार तसेच भाजपाकडून केला जात आहे. राज्य सरकारनेदेखील मुंबई महापालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर आता पालिकेच्या कारभाराची नॅककडून चौकशी केली जाणार आहे.