अहिल्यानगरः राज्य सरकारने गुढपाडवा सणानिमित्त अंत्योदय गटातील लाभार्थींना साड्या भेट देण्याचे जाहीर केले होते. साड्यांचे लाभार्थीना होळीपासून वितरण करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्याने ७८ हजार ९५० लाभार्थी संख्या कळवून मागणीही पूर्वीच नोंदवली. मात्र अद्याप साड्यांचा पुरवठाच झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील लाभार्थीमध्ये यंदा साडी मिळणार का? याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे.
गुढीपाडवा सण उद्याच, रविवारी असल्याने साड्या मिळण्याची शक्यता आता दुरापस्त मानली जाते. जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी राज्य सरकारकडे मागणी नोंदवली असून अद्याप साड्या जिल्ह्याला पोहोच झाल्या नसल्याचे स्पष्ट केले.
अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक साडी दिली जाते. जिल्ह्यात ८७ हजार ९५० महिलांना गुढीपाडव्यापूर्वी स्वस्त दुकानातून प्रत्येकी एक साडी मिळणार होती. होळीपासून स्वस्त दुकानातून या साड्यांचे वाटप करण्याचे नियोजन होते. मात्र अद्याप साड्याच आलेल्या नाहीत. त्यामुळे वाटप करण्याचा प्रश्न येत नाही. मागील वर्षी अंत्योदय गटातील शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा सणानिमित्त साडी वितरण राज्य सरकारकडून करण्यात आले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे लाभार्थ्यांना साडी वितरणात खंड पडला होता. मात्र त्यानंतर त्या स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
राज्य सरकारने यंदाही अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून गुढीपाडवा सणानिमित्त साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना स्वस्त धान्य दुकानांमधून एक साडी मोफत उपलब्ध होणार याबद्दल त्यांच्या मनात आशा निर्माण झाली होती. शिधापत्रिकाधारकांना साड्यांचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील गोदामात या साड्या गुढीपाडवा सणाच्या आदल्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या नव्हत्या. त्यामुळे लाभार्थी महिलांना साड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
यापुर्वीच्या आदेशानुसार साड्यांचे वितरण २६ जानेवारी ते होळी दरम्यान करण्याचे शासनाने निश्चित केले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावातील स्वस्तभाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोहोच होतील याची दक्षता घेण्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमाग महामंडळास कळवले होते. त्यानुसार महामंडळाकडून राज्यातील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा करण्यात येणार होता. परंतु जिल्ह्याला अद्यापि साड्या उपलब्ध झालेल्या नाहीत.