अहिल्यानगर : जामखेड शहरातील बीड रस्त्यावर चारचाकी मोटार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर, मोटारीने पेट घेतला. या अपघातात जामखेड पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यासह आणखी एका तरुणाचा जळुन मुत्यू झाला. हा अपघात आज, सोमवारी पहाटे घडला.

धनंजय नरेश गुडवाल, (३५) व महादेव दत्ताराम काळे, (२८ वर्षे, रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रस्ता जामखेड) अशी दोघा मृतांची नावे असल्याची माहिती जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे आज पहाटे ४ च्या सुमारास मोटारीतून (एमएच १६ डीएम ३८५३) जामखेड शहराकडे येत होते. मोटार एका हॉटेलसमोरील दुभाजकाला धडकली व मोटारीने पेट घेतला. अत्याधुनिक पध्दतीमुळे मोटारीचे दरवाजे लॉक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोटारीतील दोघांना बाहेर पडता आले नाही. त्यातच दोघांचा मोटारीतच जळुन दुर्दैवी मुत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातो.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले. यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. अग्नीशमन दलाचे आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या जवानांनी त्यासाठी प्रयत्न केले. मोटार पूर्ण जळुन खाक झाली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. अपघातील मृत महेश काळे याचे बीड रस्त्यावर साईनाथ पान शॉप दुकान आहे. अधिक तपास तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.

जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षापासून अपुर्ण आहे. दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात. यामुळे लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.

Story img Loader