अहिल्यानगरः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी भिंगारमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आज, सोमवारी बंद पाळण्यात आला. बंदच्या आवाहनाला भिंगारमधील सर्वच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भिंगार वेशीजवळील आंदोलनात पाकिस्तान मुर्दाबाद… पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला. तसेच झेंडा जाळून निषेधही करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आर. के. दहिफळे यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. आंदोलनात प्रकाश लुनीया, संभाजी भिंगारदिवे, सुनील लालबोंद्रे, महेश नामदे, संजय सपकाळे, विष्णू घुले, सचिन जाधव, नामदेव लंगोटे, रवींद्र लालबोंद्रे, संतोष बोबडे, शाम वाघस्कर आदींसह कार्यकर्ते सहभागी होते.
निवेदनात नमूद केले की, पहेलगाम येथे पाकिस्तानी धर्मांध अतिरेक्यांनी फक्त हिंदू धर्मीय पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची अमानुषपणे हत्या केली. केंद्र व राज्य सरकारने अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या देशद्रोही लोकांचा शोध घेऊन त्यांना यमसदनी पाठवावे. भिंगारमधील पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांचीही देशातून हकालपट्टी करावी, सरकारी सेतू कार्यालये व पुरवठा अधिकारी अशा देशद्रोही नागरिकांना भारतीयत्वाचे दाखले देतात, त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी.
हल्ल्याच्या निषेधासाठी आज सकाळी मारुती मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले. सायंकाळी ७.३० वा. नागरिकांनी घर व दुकानातील लाईट बंद करून, पणती लावून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नीलेश साठे, प्रज्योत लुनिया, राजेंद्र फुलारे, बापू लिपणे, नाना मोरे, सुदाम लांडे, लॉरेन स्वामी, रुपेश भंडारी, श्लोक भंडारी, सोमनाथ आव्हाड आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.