अहिल्यानगरः आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर मनपाने आज, सोमवारी सायंकाळी गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. गाळेधारकांनी विरोध केला, मात्र पोलीस बळाचा वापर करत अतिक्रमणे हटवण्यात आली. गाळेधारक व पोलिस यांच्यामध्ये झटापट झाली.
या अतिक्रमणधारकांना सन २०१९ व सन २०२३ मध्ये दोनवेळा नोटीस देण्यात आल्या होत्या, मात्र तरीही अनधिकृत गाळे न काढल्याने तसेच ही अतिक्रमणे खाजगी जागेत करण्यात आली होती, त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. उद्या, मंगळवारीही कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामे करून, अतिक्रमणे करून जागा बळकवण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत, त्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी करत आमदार जगताप व त्यांच्या समर्थकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास अतिक्रम निर्मूलन प्रमुख अनिकेत बल्लाळ व अभियंता सुरेश इथापे यांच्यासह महापालिका पथक पारिजात चौकात गेले.
गाळेधारकांनी कारवाईला विरोध केला. आयुक्तांशी चर्चा केली. गाळेधारक जागा खाली करण्यास तयार नसल्याने अखेर पथकाने जेसीबीच्या साह्याने काही गाळे जमीनदोस्त केले. या जागेत १५ ते १६ अनधिकृत पत्र्याचे शेड टाकून गाळे करण्यात आले आहेत. उर्वरित गाळे काढण्यासाठी मंगळवारी पुन्हा कारवाई केली जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
मनपाने कारवाई सुरू केल्यानंतर जागामालक व गाळेधारकांनी गाळे खाली करण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. मात्र केवळ कारवाईचे आदेश असल्याचे सांगत पथकाने कारवाई सुरूच ठेवली. गाळेधारकांनी जेसीबीवर चढून, आडवे येऊन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून त्यांना बाजूला केले. यावेळी गाळेधारक व पोलिसांमध्ये झटापट झाली. काही गाळेधारकांना पोलिसांच्या गाडीत बसून तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणानुसार खाजगी व सार्वजनिक जागेत सुमाराचे तीन हजारावर पत्रा गाळे उभारण्यात आले आहेत. त्यांना कोणतीही कर आकारणी होत नाही. हे पत्रा गाळे हटवण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, मात्र ते अजूनही कायम आहेत.