अहिल्यानगरः सुमारे ५२६ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या, अहिल्यानगर शहराजवळील भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. लवकरच हा निधी उपलब्ध होईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या आराखड्यातील कामे होणार आहेत.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. जिल्हा प्रशासनाने भूईकोट किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सुमारे ९५ कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यातील २५ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अराखड्यातील कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत.

१५ व्या शतकाच्या अखेरीस, इसवी सन १४९० मध्ये अहमदशहाने शहराच्या स्थापनेबरोबरच जवळच किल्ल्याची उभारणी केली. त्यानंतर हा किल्ला सुलताना चांदबिबी, मुघल, पेशवे, ब्रिटिश अशा सत्तांतरात हस्तांतरीत झाला. स्वातंत्र्य चळवळीत, १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष या राष्ट्रीय नेत्यांना शहराजवळील भुईकोट किल्ल्यात बंदीवासात ठेवण्यात आले होते. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ ग्रंथ याच किल्ल्यात लिहिला. त्याची काही हस्तलिखिते आजही किल्ल्यात पाहायला मिळतात. याच किल्ल्यात डॉ प्रफुल्लचंद्र घोष यांनी ‘हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला. स्वातंत्र्यानंतर किल्ला लष्कराच्या ताब्यात देण्यात आला आताही तो लष्कराच्या ताब्यात आहे. मात्र स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय नेत्यांच्या बंदीवासाची ठिकाणे नागरिकांसाठी पाहण्यास खुली आहेत. सुमारे १.५ किमीचा परीघ, खंदक, झुलता पूल, प्रवेशद्वार, वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासारखी आहे. लगतच जॉगिंग ट्रॅक अलीकडच्या काळात तयार करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने ‘चॅलेंज बेसड् डेस्टिनेशन डेव्हलपमेंट स्कीम’ उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटन विकास योजना तयार केली होती. त्यामध्ये स्वदेश दर्शन, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळे, व्हायब्रंट व्हिलेज, इको पॉइंट आदी निकषानुसार आराखडे सादर करण्यास सांगण्यात आले होते.

महाराष्ट्रात एकमेव मान्यता

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळ विकसित करण्याच्या प्रवर्गात सादर केलेला महाराष्ट्रातील एकमेव आराखडा मंजूर करण्यात आला. सुमारे २५ कोटी रुपये खर्चाचा हा आराखडा आहे. सुरुवातीला ३० टक्के, नंतर ३० टक्के, नंतर २० टक्के व अखेर १० टक्के अशा प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

अराखड्यानुसार होणारी कामे

या आराखड्यात वाहनतळ, प्रवेशद्वार दुरुस्ती, स्वच्छतागृह, पथदिवे, राष्ट्रीय नेते बंदीवासात असलेल्या खोल्यांची डागडुजी, अँपी थिएटर, सौरऊर्जा प्रकल्प, वृक्ष लागवड, रोषणाई, किल्ल्याची माहिती देणारे संकेतस्थळ, मदतकक्ष, किल्ल्याची माहिती देणाऱ्या गाईडचे प्रशिक्षण व डिजिटल मार्केटिंग आदीं कामांचा समावेश आहे.

Story img Loader