अहिल्यानगर : शहरातून बेपत्ता झालेले व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (६८) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. १० कोटी रुपयांच्या मागणीसाठी त्यांचे अपहरण करून नंतर गळा आवळून खून करण्यात आला. यासंदर्भात तोफखाना पोलिसांनी बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज, मंगळवारी दिला.
किरण बबन कोळपे (३८, रा. विळद, ता अहिल्यानगर) व त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (२८, ब्राह्मणी, राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असल्याचे व त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे तपासी अधिकारी तथा तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेची माहिती घेत तपासाच्या सूचना दिल्या. दीपक परदेशी यांची चितळे रस्त्यावर फर्म आहे व ते बोल्हेगाव उपनगरात राहतात. ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दुसऱ्या दिवशी तोफखाना पोलीस ठाण्याकडे केली होती. पोलिसांनी परदेशी यांचा शोध घेत अनेकांची जबाब नोंदवले, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना तीन ठिकाणी संशयास्पद इंडिका मोटर जाताना आढळली. ही मोटर किरण कोळपे वापरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी कोळपे व त्याच्या साथीदार मोरे याला ताब्यात घेतले.
दीपक परदेशी यांनी विळद गावातील जगताप, भुजबळ, खरमाळे, आडसुरे यांना पैसे दिले होते. हे पैसे वसूल करून देण्याचे काम किरण कोळपे याच्यावर सोपवले होते. कोळपेने सागर मोरेला मदतीला घेतले. मात्र या दोघांना ती रक्कम वसूल करता आली नाही. त्यामुळे परदेशी यांच्याकडूनच पैसे उकळण्याचा डाव त्यांनी रचला. असे या दोघांनी पोलिसांना सांगितले. दीपक परदेशी यांचे अपहरण करून अधिक रक्कम वसुली करण्याचा डाव त्यांनी रचला.
परदेशी यांना बोल्हेगाव येथून इंडिका मोटरमध्ये बसवल्यावर किरण कोळपेने त्यांच्याकडे १० कोटींची मागणी केली. सागर मोरेने त्यांचे दोन्ही हात बांधून ठेवले. मोटारीमध्ये परदेशी यांच्याशी झटापट झाली. मोरेने नायलॉनच्या दोरीने परदेशी यांचा गळा आवळला तर कोळपेने त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर निंबळक बाह्यवळण रस्त्यावर मोटार नेऊन दोघांनी परदेशी यांचा गळा दोरीने आवळून मोटारीमध्येच खून केला. खून केल्यानंतर मोटारीतून मृतदेह निंबळक बाह्यवळण रस्त्यावर नेण्यात आला. तेथे सिमेंटच्या बंदिस्त नालीमध्ये मृतदेह आतमध्ये टाकण्यात आला. किरण कोळपे व सागर मोरे पुन्हा एमआयडीसीकडे आले. तेथे व्यापारी दीपक परदेशी यांचा मोबाईल सागर मोरेने एका धावत्या मालमोटारीमध्ये टाकून दिला. दोघा आरोपींनी मृतदेह टाकल्याचे ठिकाण पोलिसांना दाखवले.