अहिल्यानगर : आरक्षण डावलून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज, सोमवारपासून बँकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी निदर्शने करत बोंबा मारल्या.

आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रा. किसन चव्हाण, ॲड. अरुण जाधव, उत्कर्षा रुपवते, योगेश साठे, अनिल जाधव, संतोष चोळके, हनीफ शेख, प्यारेलाल शेख, सुधीर ठोंबे, देविदास भालेराव, प्रसाद भिवसने, मारुती पाटोळे, पोपट शेटे, सोमनाथ भैलुम आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

जिल्हा बँकेच्या जाहीर झालेल्या भरतीत आरक्षण तरतूदीची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. सरळ भरतीने संविधानाच्या सामाजिक न्यायतत्त्वाचा भंग केला जात आहे. या भरतीत वंचित घटकांवर अन्याय होत आहे. जिल्हा बँक हा शासनाचा उपक्रम आहे. त्यामुळे बँकेला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता ५२ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. जिल्हा बँकेने सेवक भरतीचे जे नियम सहकार खात्याकडून मंजूर करून घेतले, त्यात राखीव जागेची तरतूद आहे. तरीही जिल्हा बँकेने आरक्षणाशिवाय नोकर भरतीचा घाट घातल्याचा आरोप किसन चव्हाण यांनी केला.

आंदोलनस्थळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सिताराम गायकर व विद्यमान उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी चर्चेचे आमंत्रण दिले. मात्र आंदोलकांनी त्यांचे आमंत्रण नाकारुन आंदोलन सुरु ठेवले तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आणि सहायक निबंधक गणेश औटी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेत भरती प्रक्रिया राबविण्याचे ठोस आश्‍वासन मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.

Story img Loader