अहिल्यानगरःशेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमीष दाखवून फसवणकीच्या घटनेत आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा छडा अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी लावला आहे. या टोळीतील आरोपी कंबोडिया देशातील कंपन्यांशी संपर्क साधून हवालाद्वारे परदेशात पैसे पाठवत होते. या फसवणुकीत चीनमधील नागरिकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी ही माहिती दिली. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये राजस्थान व गुजरातमधील आरोपींचाही समावेश आहे. या टोळीने भारतीय चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये (युएसडीटी) रूपांतरित करून कंबोडियामध्ये पाठवल्याचे पोलिस तपासात आढळले.
यासंदर्भात दीपककुमार जोशी (रा. संत विहार, सोलापूर, मूळ रा. पाटण, गुजरात) याच्यासह राजेश राठोड उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग, रा. बिंजारी, राणीगाव, नागौर राजस्थान) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. राजेश राठोड हा कंबोडिया येथील कंपन्यांशी संपर्क साधून पैसे हवाला मार्फत परदेशात पाठवण्याचे काम करत होता तर दीपककुमार जोशी हा राजेंद्र राठोड याच्या सांगण्यावरून भारतीय चलन परदेशी डिजिटल चलनात रूपांतर करून कंबोडियाला पाठवत होता. राजेंद्र राठोडच्या चौकशीतून फसवणुकीत चीनच्या नागरिकांचा सहभाग असल्याचे आढळले आहे. दीपककुमार जोशीकडून १३ लाख ९२ हजार रुपये रोख, एक कार, ३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत मोठ्या परताव्याचे आमीष दाखवत शहरातील नागरिकाची १ कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात २७ जानेवारी २०२५ रोजी दाखल झाला होता. ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज नावाने व्हाट्सअपवरून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर २० ते ३० टक्के अधिक नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती.
सायबर पोलिसांनी या गुन्हेचे तांत्रिक तांत्रिक विश्लेषण करत बँक खात्याच्या माहितीद्वारे सुरुवातीला महावीर कांबळे (रा. गोटेवाडी, मोहोळ, सोलापूर) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून आणखी तीन साथीदार प्रवीण लोहे, शिवाजी साळुंखे व सागर कुलकर्णी यांचा सहभाग उघड झाला. सध्या कांबळे याची जामीनदार मुक्त झाला आहे तर अन्य तिघे न्यायालयीन कोठडीत (मुंबई) असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.
नागरिकांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य तपासणी करूनच गुंतवणूक करावी तसेच आपले बँक खाते व कागदपत्रे त्रयस्थ व्यक्तींना देणे टाळावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पेंदाम, उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल मुसळे, अरुण सांगळे, मोहम्मद शेख यांचे पथक अधिक तपास करत आहे.