अहिल्यानगरः जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करत एकूण ४ गावठी कट्टे व ७ काडतुसे जप्त केली आहेत. आज शुक्रवारी दिवसभरात अहिल्यानगर शहरातील माळीवाडा व भुतकरवाडी परिसर येथे, शिर्डी शहर व राशीन (कर्जत) येथील मोहीमेत ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात नाकाबंदी सुरू असताना कोतवाली पोलिसांच्या पथकाने एका चारचाकी वाहनातील व्यक्तीकडून गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली. त्याच्या मोबाईलवर हातात कट्टा असलेला डीपी लावण्यात आला होता. पोलिसांनी कारही जप्त केली आहे. अक्षय आण्णासाहेब कोबरणे (रा. गायके मळा, केडगाव, अहिल्यानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील तोफखाना पोलीसांनी भुतकरवाडीतील उपसा केंद्र ते कराळे क्लब हाऊस रस्त्यावर राहुल मधुकर गायकवाड (२९, रा. वारुळाचा मारुती, नालेगाव, अहिल्यानगर) याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व एक काडतुस जप्त केले. त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. शिर्डी शहर परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना सराईत गुन्हेगार महेश गोरख बोऱ्हाडे (रा. श्रीरामनगर, शिर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व २ काडतुसे तसेच चोरीची बुलेट जप्त केली. त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील राशीन येथील करपडी फाटा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली. शिवाजी विजय देवकाते (३४, रा. मदनवाडी, भिगवण, इंदापूर, पुणे) असे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे (रा. जवळा, जामखेड) याच्याकडून कट्टा काडतुस घेतल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर कोल्हे फरार आहे. या दोघांविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार अमोल कोतकर रोहित मिसाळ भाऊसाहेब काळे बाळासाहेब खेडकर मनोज लातूरकर महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.