अहिल्यानगरः जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आयोजित केलेल्या लोक अदालतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुलीचे विक्रमी संख्येने दाखलपूर्व दावे सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंतच्या लोक अदालतमधील प्रकरणांमध्ये उच्चांकी थकबाकी वसुली ग्रामपंचायतींना मिळाली आहे. एकूण ८ कोटी ५६ लाख २७ हजार ८४४ रुपयांच्या वसुलीचे झाले आहेत. यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टीसह गाळेभाड्याच्या वसुलीचा त्यामध्ये समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून आज, मंगळवारी प्राप्त झाली. मार्चअखेरीच्या कालावधीत ग्रामपंचायतींची वसुलीसाठी मोहीम सुरू असतानाच उत्पन्नात भर घालणारी मोठी वसुली याच दरम्यान झाली आहे. त्यामुळे ग्रामनिधीत भरपडून ग्रामपंचायतींच्या विकास कामांना निधीही उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील १३२३ पैकी ११३९ ग्रामपंचायतींनी लोक अदालतमध्ये सहभाग नोंदवला. लोक अदालतीच्या नोटिसा थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील १३२३ ग्रामपंचायतींचे ७ लाख २ हजार ९२२ खातेदार आहेत. त्यातील ९५ हजार ७५१ खातेदार थकबाकीत आहेत. त्यांच्या थकबाकी वसूलीचे दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यात आले होते. यातील ८४ हजार ११५ नोटीसा जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने थकबाकीदारापर्यंत अल्पावधीत पोहोचवल्या होत्या. यातील ५१ हजार १९७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सर्व करांचा मिळून ८ कोटी ५६ लाख १७ हजार ८४४ रुपयांची थकबाकी वसुल झाली आहे.

जिल्ह्यातील १३२३ ग्रामपंचायतींची घरपट्टीची एकूण मागणी ५१ कोटी ५९ लाख ८५ हजार ७५ रुपये होती. फेब्रुवारी २०२५ अखेर ३७ कोटी ९३ लाख ७ हजार ५३५ रुपये (७५.४५ टक्के) वसुली झाली आहे तर पाणीपट्टीची २४ कोटी ६० लाख ७ हजार ३९० रुपयांपैकी १८ कोटी ४५ लाख २९ हजार ९१७ रुपयांची (७५.०१ टक्के) वसुली झाली आहे. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी थकबाकीदारांची दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतमध्ये वसूलीसाठी ठेवण्यात आली होती.

लोक अदालतच्या माध्यमातून वसुलीसाठी जिल्हा परिषदेने यंदा थकबाकीदारांपर्यंत नोटीसा पोहचवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्याच्या परिणामातून आतापर्यंतची विक्रमी थकबाकी वसुली झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची एकूण थकबाकी वसुली पुढीलप्रमाणे- राहुरी ४ लाख ७८ हजार ५३५ रुपये, कर्जत ५ लाख ३१ हजार ४७० रु., शेवगाव १८ लाख ४९ हजार ७३२, श्रीरामपूर २८ लाख ८७ हजार २२७, जामखेड ३४ लाख १३ हजार २०६, पाथर्डी ३७ लाख ३४ हजार ४९४, संगमनेर ४१ लाख ३६ हजार ४३५, अकोले ४५ लाख २६ हजार ४९४, नेवासे ४९ लाख ८४ हजार २७१, कोपरगाव ५४ लाख १५ हजार ८९४, पारनेर ७२ लाख ६४ हजार १८३, श्रीगोंदे १२ लाख ३७ हजार ६५८, राहता १ कोटी २९ लाख ३७ हजार १०१ व अहिल्यानगर २ कोटी १० लाख ८८ हजार १४४ अशी एकूण ८ कोटी ५६ लाख १७ हजार ८४४ रुपयांची थकबाकी वसूल झाली.