अहिल्यानगर : महामार्गांवरील खासगी हॉटेल, ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा, ढाब्यांसाठी नियमावली लागू करा, सर्व बसस्थानकात सीसीटीव्ही बसवा, एसटी व पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकाचे फलक लावा, जिल्ह्यातील सर्व आगारांची पाहणी करा, अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, गुरुवारी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ‘स्वारगेट’ (पुणे) घटनेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज बैठक आयोजित केली होती. प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व नितीन दिनकर आदी उपस्थित होते.

लांब पल्ल्याच्या एसटी बस महामार्गांवरील खाजगी ढाबे, हॉटेलवर थांबतात. त्यांच्यासाठी नियमावली तयार करा. ढाबेचालक नियमालांचे पालन करतात की नाही, प्रवाशांना सुविधा मिळतात की नाही याची तपासणी करा. तेथील स्वच्छतागृह, सुरक्षेचे वातावरण प्रवाशांसाठी योग्य आहे की नाही याची पाहणी करा, अन्यथा वरिष्ठांनी मंजूरी दिली, चालकांना मोफत जेवणाची ‘पॅकेज’ मिळते परंतु प्रवाशांना काय मिळते; तेही पहा, असेही मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील आगारांची तपासणी करा, तेथील बंद गाड्या तपासणीची मोहीम घ्या, सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस ठाण्याची जोडा, सौर प्रकल्प उभारून बसस्थानकात दिव्यांची व्यवस्था करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील बसस्थानक राज्य सरकारच्या निधीतून उभारण्याऐवजी, त्यावर अवलंबून राहण्याऐवजी ‘बीओटी’ची प्रकल्प तयार करा. त्या माध्यमातून एसटी महामंडळाचे उत्पन्नही वाढेल. जिल्ह्यात सध्या अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. आम्ही अतिक्रमणे हटवतो, मात्र बसस्थानकांभोवतीलच्या अतिक्रमणांकडेही महामंडळाने लक्ष द्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुढील महिन्यात मुंबईत पुन्हा बैठक आयोजित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.