कर्जत : सुमारे सहा दशके वेगवेगळ्या वाटांनी प्रवास केल्यानंतर, एका शाळेतील १९६६ बॅचचे जुनी अकरावी या वर्गातील विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. ५९ वर्षांनी झालेल्या या अनोख्या पुनर्मिलनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आनंदाश्रूंच्या सरींनी वातावरण भारावून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहिल्यानगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय ही सर्वात पहिली माध्यमिक शाळा. त्या काळात पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. शाळेत बसण्यासाठी वर्ग खोल्यांची कमतरता, बेंचेस नव्हते. वीज आणि पाणीटंचाई, शाळेत येण्यासाठी कोणतीही साधने नव्हती, अनेक किलोमीटर पायी प्रवास करून विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत. असा तो सर्वकाळ म्हणजे १९६६ या वर्षी जुनी अकरावी हीच सर्वात मोठी आणि महत्त्वाची परीक्षा मानली जात. त्यावेळी या विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी रविवारी सुट्टीच्या दिवशी पुन्हा एकदा याच शाळेमध्ये, त्याच जुन्या वडाच्या झाडाखाली एकच आले. अनेक वर्षांनी एकमेकांना पहात असल्यामुळे प्रत्येकाचा रंग रूप आकार सर्वकाही बदललेले. सरासरी आयुष्यमान प्रत्येकाचे ७५ वर्ष वय असलेले. मात्र आपल्या जुन्या मित्रांना तो कसा दिसतो.. काय बदल झालेला आहे, अशी अनामिक ओढ प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, बीड, अहिल्यानगर यासह जिल्ह्यामध्ये स्थायिक झालेले परंतु याच शाळेमध्ये शिक्षण घेणारे हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते.

प्रत्येक जण एकमेकाला पाहताच आनंदाने मिठी मारत होता.. अनेकांच्या डोळ्यामधून अश्रू वाहत.. एकमेकाचा हात हातात घट्ट धरून तू कसा आहेस.. हे चौकशी करतानाच अनेक जण ५९ वर्षांपूर्वीच्या काळामध्ये आपण काय केले या आठवणींमध्ये हरवून गेले होते. वय वाढलं तरी देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आणि मनातील उत्साह एखाद्या युवकाला लाजवेल अशा पद्धतीचा दिसून आला. प्रत्येक जण अतिशय उत्साहात होता. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसह नातवंडांना देखील आपली शाळा पाहण्यासाठी आणले होते. थरथर त्या हाताने एकमेकाचा सेल्फी घेण्यामध्ये अनेक जण मग्न होते. आपला मित्र मैत्रीण भेटल्याचा आनंद चेहऱ्यावरून दिसून येत होता. या सर्व आनंदीमय वातावरणामध्ये महात्मा गांधी विद्यालयातील प्रांगण जणू पुन्हा एकदा ५९ वर्ष मागे गेले की काय असा आभास या ठिकाणी निर्माण झाला होता.. काय बोलू किती बोलू असं प्रत्येकाला बोलताना जाणवत होते.. त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासातील अनुभव, यश-अपयश आणि आठवणी शेअर केल्या. काही जण निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय होते, काहींनी आपल्या आवडीच्या छंदांना पुन्हा सुरुवात केली, तर काहींनी आपल्या व्यवसाय व कौटुंबिक जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळल्या.

जुने शिक्षक आणि मित्र भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. “५९ वर्षांनी जरी आम्ही भेटत असलो, तरी आमची मैत्री तशीच ताजीतवानी आहे,” असे अनेक जण सांगत होते.

स्नेह मेळाव्याने सर्वजण भारावले…

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी या बॅचला शिक्षक म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणारे, बोलगे सर होते. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य राजेंद्र फाळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. किसनराव राऊत, शेळके सर राजेंद्र फाळके प्राचार्य राजकुमार चौरे ज्ञानदेव कदम व श्री बोलगे सर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाची प्रस्ताविक किसनराव महामुनी, सूत्रसंचालन शीला अनासपुरे यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी कल्याण मनोहर यांनी शाळेला एक लाख रुपयाचा धनादेश आईच्या स्मरणार्थ दिला तर सर्व माजी विद्यार्थ्यांनी सात पॅन्ट विद्यालयास भेट दिले. प्रत्येक वर्षी एकमेकांना भेटूया असा भावनिक निरोप देऊन व आजच्या भेटीच्या सर्व आठवणी पुन्हा एकदा हृदयामध्ये साठवून या स्नेह मेळव्याची गळाभेट घेऊन सांगता झाली. या स्नेह मेळाव्यासाठी किसनराव राऊत किसनराव महामुनी व पवार यांनी परिश्रम घेतले.