अहिल्यानगर : जिल्ह्यात औद्योगिक विकासाचे वातावरण तयार केले जात असतानाच काही खंडणीखोरांच्या टोळ्याही जमा होऊ लागल्या आहेत. परप्रांतीयांना रोजगारात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे या खंडणी बहाद्दरांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. उद्योजकांनी परप्रांतीयाऐवजी स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. जिथे स्थानिक उपलब्ध होणार नाहीत तिथे परप्रांतीय ठेवावेत. यासाठी उद्योजकांची बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, रविवारी येथे बोलताना सांगितले.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत १२ पैकी १० महायुतीचे आमदार विजयी झाले, त्यांचा सत्कार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री विखे बोलत होते. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप, काशिनाथ दाते, विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ व विक्रम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री विखे यांनी पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आहिल्यानगर विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती दिली. पश्चिम वाहिन्यांचे ६५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. ५ वर्षात हे काम पूर्ण केले जाईल. त्यासाठी ४० ते ५० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातून नाशिक- आहिल्यानगर- मराठवाडा प्रादेशिक वाद संपेल. दुष्काळी भागास पाणी मिळेल.
सभापती राम शिंदे यांनी पालकमंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मागील लावू अशी ग्वाही दिली. विखे यांनी जिल्ह्याच्या विकासात दिलेल्या योगदानामुळेच जिल्हा महायुतीमय झाल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार सुजय विखे म्हणाले, सकाळाई पाणी योजनेसाठी २ टीएमसी पाणी आरक्षित झाले आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दोन महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन होईल. मी माजी असलो तरी आजी आमदारांच्या ५० पट अधिक काम करू शकतो. त्यामुळे माझे राजकीय पुनर्वसन करण्याचा विचार राम शिंदे व शिवाजी कर्डिले यांनी करावा.
आमदार कर्डिले यांनी विजेचा, वावरथ-जांभळी येथील मुळा धरणातील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची तसेच सकाळाईचा प्रश्न मंत्री विखे यांनी मार्गी लावला, जिल्ह्यातील जलसंपदाचे इतर प्रश्नही त्यांनी मार्गी लावावीत अशी मागणी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी स्वागत केले. आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, काशिनाथ दाते यांची भाषणे झाली.
साकाळाई योजनेचे दोन महिन्यात भूमिपूजन
पुण्यातील नेत्यांनी जिल्ह्यात केवळ झुंजी लावल्या, पाण्यासाठी संघर्ष करायला लावला, जिल्ह्याचा विकास बाहेरील नेते नाही तर आपणच करू शकतो, असे सांगत मंत्री विखे म्हणाले, साकळाई पाणीयोजनेची अनेकांनी टिंगलटवाळी केली. आता त्याचे दोन महिन्यातच भूमिपूजन होत आहे. ज्यांनी या प्रश्नावर राजकारण केले, त्याचा आपण बंदोबस्त करू. कुकडीसाठी ही संघर्ष करावा लागतो आहे. १८०० क्युसेक्सचा कालवा १२०० ने वाहतो आहे. त्याची क्षमता पुनर्स्थापित करून १६०० चा कालवा बंद पाईपचा केला जाईल. त्यामुळे चोऱ्या थांबतील, पाणी वाचेल. निळवंडे कालव्याचे पाणीही पाईपद्वारे देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कर्जतच्या पाण्यासाठी उजनीच्या बॅकवॉटरमध्ये बॅरिगेज बांधणार आहेत. शेवगावची ताजनापुर प्रकल्प जुना झाला आहे, त्याचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल.