राहाता : कोपरगाव शहरात माता रमाई आंबेडकर जयंतीच्या फलकाचा आज शनिवारी पहाटेच्या सुमारास अवमान केल्याच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिय्या आंदोलन छेडले आहे. संतप्त नागरिकांनी कोपरगाव बंदची हाक दिल्याने संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संतप्त झालेल्या भिमसैनिकांनी ठिय्या आंदोलन बस स्थानक परिसरात केल्याने कोपरगाव बस स्थानकातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तसेच, शहरातील संपूर्ण रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या आहे.फलकाच्या अवमानामुळे आंबेडकरी समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. कोपरगाव शहरातील साईबाबा कार्नर येथे अहिल्यानगर – मनमाड महामार्गावर मोठा जमाव रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन सुरू केले असुन यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.या ठिकाणी मोठ्या संख्येने भीमसैनिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा झाले असून जोपर्यंत आरोपीचा शोध घेऊन अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी ठाम भूमिका भीमसैनिकांनी घेतली आहे.
गेल्या पाच दिवसातील रमाबाई आंबेडकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक फाडून विटंबना करण्याची दुसरी घटना असल्याने जमाव आक्रमक झालाय. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.घटनेचा तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता शिर्डीचे पोलिस उपाधिक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.