अहिल्यानगर : केंद्र सरकारने गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. या नवीन निर्बंधानुसार जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडील साठ्याची केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त पथकामार्फत उद्या, बुधवारपासून तपासणी सुरू केली जाणार आहे. अन्न महामंडळ, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभाग या तीन विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत ही तपासणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने गव्हाचा काळाबाजार व भाववाढ रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत व्यापाऱ्यांकडील साठ्यांवर नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी ठोक, किरकोळ, साखळी दुकाने असलेली, प्रक्रिया करणारे, मिल अशा विविध व्यापाऱ्यांना साठा मर्यादा ठरवून दिल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली.

नव्या निर्बंधानुसार ठोक व्यापाऱ्यांना २ हजार टन, किरकोळ व्यापाऱ्यांना १० टन, मोठ्या साखळी दुकानदारांना प्रती डेपोसाठी १० टन, प्रक्रिया करणाऱ्यांसाठी मासिक क्षमतेच्या ६० टक्के साठ्याला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक व्यापाऱ्याने साठा कळवण्यासाठी केंद्र सरकारच्या पोर्टलवरील ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे. दर शुक्रवारी त्यांच्याकडील साठा त्यावर नोंदवायचा आहे. सध्या या मर्यादेपेक्षा अधिक साठा असल्यास तो १५ दिवसात मर्यादेत आणावयाची सूचना आहे.

जिल्ह्यात गव्हाचा साठा बाळगणारे शेकडो व्यापारी आहेत. मात्र आत्तापर्यंत केवळ २८ व्यापाऱ्यांनीच हे ॲप डाऊनलोड केले आहे. ॲप डाऊनलोड करण्यास व्यापाऱ्यांकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

तीन विभागांचे मिळून विविध पदके तयार करून उद्या, बुधवार व परवा गुरुवार असे दोन दिवस तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये किराणा व्यापारी, ठोक व्यापारी, मिल, प्रक्रिया करणारे अशा सर्वांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पथके तयार केले जातील. असे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले.

याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने आडत बाजार व्यापारी संघटनेची बैठकही आज आयोजित केली होती. मात्र ऐनवेळी दिलेल्या सूचनेमुळे या बैठकीस मोजकेच व्यापारी उपस्थित राहिले. याशिवाय पुरवठा विभागाने व्यापाऱ्यांची भारतीय अन्न व सुरक्षा मानक प्राधिकरण, कृषी उत्पन्न बाजार समिती वस्तू व सेवा विभाग यांच्याकडूनही व्यापाऱ्यांच्या नोंदणीची माहिती मागवली आहे. ज्या व्यापाऱ्यांची गोदामे आहेत त्याचीही तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान या संदर्भात बोलताना अहिल्यानगर आडत बाजार व्यापारी संघटनेचे सचिव संतोष बोरा यांनी सांगितले की, शासनाचे नियम आम्ही पाळण्यात तयार आहोत. मात्र ऑनलाइन पद्धत समजून घेण्यासाठी, ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती भरण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. तो पुरेसा मिळालेला नाही. त्यापूर्वीच तपासणी सुरू करण्यात आली आहे. ऐनवेळी सूचना दिल्यामुळे पोर्टलवर नोंदणी कमी झाली आहे. संघटनेचे अहिल्यानगर शहरात सुमारे ३४० सभासद आहेत. यापैकी केवळ २८ नोंदणी करू शकले आहेत.

Story img Loader