अहिल्यानगरः शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडलेले किरण काळे यांनी आज, रविवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाल दिली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, किरण काळें यांचा प्रवेश म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध येणे नव्हे तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेला नेण्याचे काम ते करत आहेत, असे म्हणत काळे यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी व रावसाहेब खेवरे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आदी उपस्थित होते.
प्रवेशानंतर बोलताना किरण काळे म्हणाले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्व. अनिल राठोड यांच्या विचारांना अभिप्रेत व शहरातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करू. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात संघटनेची बांधणी करु. काही लोक बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून सध्या शहरामध्ये वावरत आहेत. त्यांचा बुरखा शिवसैनिक फाडतील व खरे हिंदुत्व काय असतं हे आम्ही दाखवून देऊ.
यावेळी विलास उबाळे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, दत्ता गायकवाड, किशोर कोतकर, विनोद दिवटे, मयूर भिंगारदिवे, आकाश डहाने, राकेश बोरुडे आदी उपस्थित होते.