अहिल्यानगर : अनेकवेळा नोटीसा देऊनही महापालिकेने शहर पाणी पुरवठा योजनेचे वीज देयक न भरल्याने महावितरणने योजनेचा वीजपुरवठा आज, शुक्रवारी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. मनपाने आज किमान ५ कोटी रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, ही रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.मनपाची चालू वीज देयकाची थकबाकी सुमारे ११ कोटी तर जुनी थकबाकी १०० कोटींपेक्षा अधिक आहे. चालू देयकापैकी मनपाने काही रक्कम भरली. मात्र, अद्यापि ११ कोटीची थकबाकी आहे. या वसूलीसाठी महावितरणने यापूर्वी मनपाला नोटीसा देऊन थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या.
यासंदर्भात गेल्या आठवडाभरापासून मनपा व महावितरण यांच्या अधिकाऱ्यात चर्चा सुरू आहेत. मात्र, थकबाकी जमा झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेवेळी थकीत रकमेपैकी किमान ५ कोटी रुपये शुक्रवारी जमा केले जातील, असे मनपाकडून सांगण्यात आले आहे.आज मनपाने थकीत बिलांपोटी ५ कोटी रुपये न भरल्यास शहर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्यापासून महापालिकेने कर वसुली वाढवण्यासाठी शास्तीमाफी केली. यात आत्तापर्यंत अवघे १७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. थकबाकीदारांचा प्रतिसाद मिळत नसताना, मनपाने कठोर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे थकबाकी वाढून मनपा आर्थिक अडचणीत आलेली आहे. मनपाने वीज देयकाच्या थकबाकीबाबत तोडगा न काढल्यास वीजपुरवठा खंडित होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
याशिवाय जलसंपदा विभागानेही महापालिकेकडील पाणीपट्टीचे ११ कोटी ६३ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी मुळा धरणातून शहर पाणीपुरवठासाठी होणारा उपसा बंद करण्याचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे. अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यावर जलसंपदा विभागाकडून कर आकरणी होते. गेल्या वर्षभरात महापालिकेने केवळ २१ लाख २० हजारांचा पाणीकर जमा केला आहे. उर्वरित रकमेच्या भरणा करण्यासाठी जलसंपदा विभागानेही महापालिकेला नोटीस बजावली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेली महापालिका जलसंपदा विभाग व महावितरण अशा दोघांच्या कारवाईच्या कचाट्यात सापडली आहे.