अहिल्यानगरः विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात १२ पैकी १० जागांवर महायुतीने यश संपादन केले. हे यश साजरे करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी आज, रविवारी आयोजित केलेल्या महायुतीच्या आमदारांचा सत्कार समारंभ राजकीय टोलेबाजीने चांगलाच रंगला. एकमेकाला कोपरखळ्या मारत, चिमटे काढत, मंत्री पदाची इच्छा व्यक्त करत आमदारांनी राजकीय रंगत आणली. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ, काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते उपस्थित होते तर आमदार आशुतोष काळे व डॉ. किरण लहामटे अनुपस्थित राहिले.

आमदार संग्राम जगताप काहीसे उशिरा आले, त्यामुळे त्यांचे मेहुणे तथा भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी त्यावर, जावई असल्यामुळे बोलता येत नाही अशी टिप्पणी केली. त्याची परतफेड करताना संग्राम जगताप म्हणाले, जावई असलो तरी पाच महिन्यात प्रथमच माझा सासऱ्यांकडून सत्कार होत आहे. आमदार राजळे म्हणाल्या जावई शेजारीच असल्याने असे होते. जावई लांब जिल्ह्याबाहेर इतर कुठे असता तर त्याचे स्वागत चांगल्या पद्धतीने झाले असते. आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह मोनिका राजळे यांनीही मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. सर्व आमदारांमध्ये आपण एकमेव ‘लाडकी बहीण’ असल्याचा दावा त्यांनी मागणी नोंदवताना केला.

माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी शिवाजी कर्डिले व राम शिंदे यांना साकडे घातले. राम शिंदे यांनी विखे यांना राज्यसभेसाठी शुभेच्छा दिल्या मात्र शुभेच्छा देताना विखे यांना श्रध्दा व सबुरी ठेवावी असा सल्लाही दिला तर शिवाजी कर्डिले यांनी त्यांचा माजी ऐवजी सध्याचे खासदार असा उल्लेख केला. मी माजी लोकप्रतिनिधी असल्याने मला केवळ भाषणासाठी बोलवले जाते, असे झाले तर काही दिवसांनी लोक मला विसरून जातील. असे होऊ नये यासाठी माझा विचार करावा. मी माजी असलो तरी विद्यमान आमदारांपेक्षा मी ५० पट अधिक काम करू शकतो.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्याने आमदार कर्डिले यांनी खताळ यांचा उल्लेख ‘जायंट किलर’ असा केला. खताळ यांनी आपण प्रथमच आमदार झाल्याने सर्वात छोटा ‘लाडका भाऊ’ म्हणून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. महायुतीच्या आमदारांचा सत्कार समारंभ डिसेंबरमध्येच होणार होता, मात्र शिवाजी कर्डिले मणक्याच्या आजाराने रुग्णालयात दाखल होते. ते बरे होऊन घरी परतल्यावर तो आता झाला. त्याचा संदर्भ देत माजी खासदार विखे म्हणाले, कर्डिले जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. साखर कारखान्यांच्या कर्जाच्या ओझ्याने जिल्हा बँक अध्यक्षांचा मणका सटकला. त्यामुळे ते आजारी पडले.

राम शिंदे सभापतीपदाचा ‘प्रोटोकॉल’ पाळत नसल्याचे टीका आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राम शिंदे म्हणाले, आपण पूर्वी प्रोटोकॉल मंत्री होतोच. त्यामुळे आपण पक्षाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, हे निवडणूक आयोगानेही स्पष्ट केले आहे. मला कोणती राजकीय परंपरा नाही, परंतु ज्यांना ६० वर्षांची राजकीय परंपरा होती, चार वेळा मुख्यमंत्री, संरक्षण, कृषी मंत्री अशी पदे घरात मिळूनही त्यांची इज्जत केवळ ६२३ मतांनी माझ्यापेक्षा अधिक ठरली आहे, हे विशेष

कार्यक्रमात विविध वक्त्यांनी शिवाजी कर्डिले अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ असल्याचा उल्लेख केला. त्यावर मंत्री विखे यांनी कर्डिले कधी कोणाला डोक्यावर, खांद्यावर घेतील हे सांगता येत नाही. त्यामुळे मी त्यांच्यापासून नेहमीच सावध असतो, अशी कोपरखळी लगावली.