अहिल्यानगर:महापालिकेच्या सन २०२५-२६ या वर्षाच्या एकूण १६८० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी आज, बुधवारी मंजुरी दिली. अंदाजपत्रकात पर्यटन विकास, वर्किंग वुमन्स होस्टेल, शहराच्या वाढत्या विस्तारासाठी ४९५ कोटी रुपयांची पाणी योजना व त्याच्या स्वहिस्स्यासाठी १५० कोटी रुपयांचे वित्तीय संस्थेकडून कर्ज, ३५ मेगा व्हॅट क्षमतेचा १७२ कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प, १४ कोटींचे जिल्हा ग्रंथालय आदी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

मनपाच्या स्थायी समिती व महासभा सभा आज प्रशासक डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन धस, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त निखिल फराटे, सपना वसावे व प्रियांका शिंदे, नगरसचिव मेहेर लहारे, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता, परिमल निकम, लेखा विभागाचे अनिल लोंढे तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी गेल्या वर्षीच्या १४७३ कोटी रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकालाही मान्यता देण्यात आली.

मनपामधील नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात येऊन सव्वा वर्ष लोटले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डांगे यांनी पहिलेच प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न ४५२ कोटी ३ लाख, भांडवली जमा ११५९ कोटी ५ लाख गृहीत धरण्यात आले आहेत.

महसुली उत्पन्नात संकलित करापोटी १०३ कोटी ८० लाख, संकलित करावर आधारित करापोटी ५८ कोटी ७० लाख, जीएसटी अनुदान १४० कोटी ६७ लाख व इतर महसुली अनुदान १८ कोटी, गाळे भाडे ३ कोटी ८२ लाख, पाणीपट्टी ३० कोटी, मीटरद्वारे पाणीपुरवठ्याचे १० कोटी, संकीर्ण ३० कोटी आदी बाबी आहेत. तर खर्चामध्ये वेतन, भत्ते व मानधनावर १७० कोटी ६४ लाख, पेन्शनसाठी ५४ कोटी, पाणीपुरवठ्याचे वीज देयक ४० कोटी, पथदिव्यांचे वीज देयक ८ कोटी, शिक्षण विभागाचा वेतन हिस्सा व इतर खर्च ६ कोटी, महिला व बालकल्याण योजना ३ कोटी २५ लाख, अपंग पुनर्वसन योजना ३ कोटी २५ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ८ कोटी ४१ लाख, औषधी व उपकरणे १ कोटी ७० लाख, कचरा संकलन वाहतूक १८ कोटी, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी, टँकरद्वारे पाणीपुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी २ कोटी ७५ लाख, अशुद्ध पाणी आकार ४ कोटी, विविध वाहनांच्या खरेदी ३ कोटी, नवीन रस्त्यांसाठी ३०० कोटी, रस्ते दुरुस्तीसाठी ३ कोटी, वृक्षारोपण व तदनुषंगीक खर्च १ कोटी, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी १ कोटी १६ लाख, मोकट कुत्री व जनावरे बंदोबस्त ९५ लाख, मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी, पुतळे बसवण्यासाठी २ कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट २ कोटी ५० लाख या बाबींचा समावेश असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

Story img Loader