अहिल्यानगरः उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी उन्हाळ्यात काय करावे व काय करू नये, याबाबत नागरिकांत जागृती करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. लग्न अथवा इतर कार्यक्रमांत मोठ्या जेवणावळी असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाढते तापमान व उष्माघात धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी उपाययोजनांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुरेशी सावली असेल अशी व्यवस्था करण्याच्या संबंधित आस्थापनांना सूचना द्याव्यात. सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्याची सोय करून पंखे, कूलर नादुरुस्त असल्यास दुरुस्त करण्याच्या सूचना द्याव्यात.
आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावावेत. नागरिकांनी काय करावे व काय टाळावे याची माहिती द्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उष्माघाताबाबत प्रथमोपचार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत, याची खात्री करावी. सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्याची सुविधा देण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांना संपर्क करण्यात आला असून, उन्हाळ्यात मोठ्या जेवणाचा कार्यक्रम असल्यास जेवणावळीसाठी आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातून हे प्रमाणपत्र मिळेल. तशा सूचना संबंधितांना द्याव्यात, असा आदेश आयुक्तांनी दिला. रखरखत्या उन्हामुळे दुपारी उद्याने बंद ठेवावीत. रस्त्यावर पाणी शिंपडावे. आरोग्य केंद्रातील केबिनमध्ये उष्माघात कक्षाची तात्पुरती व्यवस्था करावी. जिल्हा रुग्णालयात उष्माघातावर उपचारासाठी स्वतंत्र पथक आहे. तेथील रुग्णवाहिकेचा क्रमांक केंद्रावर देण्यात आला आहे.
ओआरएस देण्यात आले आहेत. दुपारच्या सत्रात मुलांच्या खेळाचे नियोजन करू नये. स्पर्धा घेऊ नयेत, अशा सूचना शाळांना द्याव्यात, शाळांमध्ये परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात. प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये भेट देऊन शाळांमध्ये ‘ओआरएस’ची पाकिटे दिली आहेत, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.