राहाता: पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आश्वी, घारगाव, लोणी व राहता येथे १५ अवैध दारू विक्रेत्यांवर छापे टाकले. या पथकाने कारवाईत दुजाभाव दाखवत ठरावीक अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाई केली, इतरांना अभय दिले. या पथकाने कारवाई करताना दोन अलिशान मोटारींचा वापर केला. ही दोन्ही वाहने विनाक्रमांक होती. ही वाहने कोणाच्या मालकीची आहेत, याची चौकशी करून या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी बाभळेश्वर येथील लोकसंग्राम परिषदेचे अध्यक्ष गोरख गवारे यांनी केली.

काल, रविवारी पथकातील कर्मचाऱ्यांनी १५ ठिकाणी अवैध व्यवसायावर छापे टाकून १५ गुन्हे दाखल केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, बिरप्पा करमल, गणेश लोंढे, पंकज व्यवहारे, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रवींद्र घुंगासे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, जालिंदर माने, रणजीत जाधव, उमाकांत गावडे व महादेव भांड यांनी केली.

चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणीही अवैध धंदे जोरात सुरू आहेत. मात्र, पथकाने पालकमंत्री विखे यांच्या मतदारसंघातीलच तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. कारवाई करताना वापरलेली विनाक्रमांकाच्या अलिशान मोटारींची चौकशी करण्याची मागणी लोकसंग्राम परिषदेचे गोरख गवारे यांनी केली आहे.