अहिल्यानगर : इ. १२ वी बोर्ड परिक्षेदरम्यान श्री वृद्धेश्‍वर विद्यालय, (तिसगाव, ता. पाथर्डी) येथे एका समाजकंटकाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केल्याच्या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेने निषेध नोंदवत परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अन्यथा परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार उध्दव नाईक व पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेतली. यासंदर्भात माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले की, परिक्षेदरम्यान शिक्षकाला चाकूचा धाक दाखवण्याची घटना, मंगळवारी पहिल्याच दिवशी घडली. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पेपर संपल्यानंतर काही गुंडांनी पेपर जमा करणाऱ्या शिक्षकाची गाडी अडवून त्यांना गाडीच्या बाहेर ओढून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

यावर्षी १२ वीच्या परीक्षेसाठी शिक्षकांची सरमिसळ पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्यामुळे ओळख नसलेल्या आणि दूरवर असलेल्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर, प्रशासनाने शिक्षकांना संरक्षण द्यावे. तसेच, अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास, इ. १० वी व १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येईल.

सरमिसळ पद्धतीने अनोळखी शाळेत शिक्षक परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी जात आहेत. तेथील परिस्थिती व ओळख नसल्याने गाव गुंडांकडून त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडतात. अशा प्रकारामुळे शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. काही गंभीर प्रकार घडण्या अगोदरच प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावे. अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाईल, असे इशारा श्री शिंदे यांनी दिला.

माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अशोक दौंड, डी. सी. फकीर, सुभाष भागवत, भारत गाडेकर, आसिफ पठाण, महिंद्र राजगुरू, आत्माराम दहिफळे, बापूसाहेब कल्हापूरे, एस. आर. पालवे, व्ही. व्ही. इंगळे, सुभाष भागवत, अजय भंडारी, समाधान आराक, सुरेश मिसाळ, छबुराव फुंदे, सी. एम. कर्डिले, एन. एस. मुथा, मच्छिंद्र बाचकर, सुधाकर सातपुते, डॉ. अनिल पानखडे, अजय शिरसाठ, व्ही. पी. गांधी आदी उपस्थित होते.

Story img Loader