अहिल्यानगरः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील (पीएम किसान) अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनातही सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या प्रचंड होती. राज्य सरकारने लाभार्यांना नंतर विविध अटी-शर्ती लागू केल्यानंतर ही संख्या घटू लागली. पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांचीही तीच वाटचाल सुरू आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये योजना लागू करण्यात आली, तेव्हा पहिल्या हप्त्याचे ७ लाख ५ हजार ६९३ पात्र लाभार्थी होते. १७ वा हप्ता जमा झाला त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या होती ३ लाख ५४ हजार ९८१. म्हणजे पात्र लाभार्थ्यांची संख्या निम्म्यावर आली. त्यानंतर १८ वा व १९ वा हप्ता वितरित होताना पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत मात्र काहीशी म्हणजे दीड लाखाने वाढली आहे. सुरुवातीच्या काळात या योजनेच्या अंमलबजावणी महसूल विभागामार्फत होत होती. जून २०२३ पासून या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत होऊ लागली आहे.

पीएम किसान योजनेत केंद्र सरकार दर चार महिन्याला २ हजार प्रमाणे तीन समान हप्त्यात एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात मदत जमा करते. सध्या या योजनेतील १९ वा हप्ता नुकताच जमा करण्यात आला. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच पीएम किसान योजनेचा लाभही सुरुवातीच्या काळात पात्र नसलेले अनेक शेतकरी घेत होते. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. त्यात ३ लाख ५० हजार ७१२ शेतकरी टप्प्याटप्प्याने वगळले गेले.

मात्र नंतर कृषी विभागाने ज्या लाभार्थ्यांनी केवायसीची पूर्तता केली नाही, ते अद्ययावत करून घेतले. बँक खाते आधार लिंक आहेत की नाही याची तपासणी केली. वारसा हक्काने लाभार्थ्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ दिला जाऊ लागला. अशा काही कारणांनी १८ व १९ व्या हप्त्याच्या वेळी लाभार्थी संख्येत वाढ झाली. १७ व्यापेक्षा १८ वा हप्ता घेणाऱ्यांच्या संख्येत सुमारे १ लाख ९० हजाराने वाढ झाली आहे तर १८ व्याच्या तुलनेत १९ वा हप्त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या पुन्हा 3191 ने घटली आहे.

एकाच कुटुंबातील दोन लाभार्थी, बँक खाते आधार लिंक नसणे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्राप्तीकर भरणारे, नोकरदार, डॉक्टर, वकील, व्यावसायिक आदींनी सुरुवातीच्या काळात लाभ घेतला, ते आता वगळले गेले आहेत.

योजनेच्या सर्वेक्षणात एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती लाभ घेत असल्याचे, प्राप्तिकर भरणारे लाभार्थी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले तसेच योजनेच्या नियमात न बसणारे लाभार्थी वगळले गेले. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे जाणवते. त्यानंतर कृषी विभागाच्या मोहिमेत केवायसी अद्ययावत करणे, वारसा हक्काचा लाभ अशा काही कारणांनी लाभार्थी पुन्हा काही प्रमाणात वाढले आहेत. – सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर.

Story img Loader