अहिल्यानगर : मध्यप्रदेशमधून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेला २९ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीचा ६६.७१० किलो वजनाचा गांजा पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेच्या व शेवगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने हातगावमधून (ता. शेवगाव) जप्त केला. या संदर्भात पोलिसांनी पिता-पुत्रांना अटक करण्यात केली आहे.
अनिल बाबासाहेब बडे (३४) व त्याचे वडील बाबासाहेब धनाजी बडे (७०, दोघे रा. हातगाव, शेवगाव) या दोघांना अटक केली आहे तर मध्यप्रदेशमधील मोतीराम (पूर्ण नाव व पत्ता नाही) अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोतीराम फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. १५ दिवसांपूर्वीच शेवगाव पोलिसांनी बोधेगाव शिवरात अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. तिथे अफूची बोंडे आलेली ९५३ झाडे आढळली होती. ११ लाख रुपये किमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली होती.
आताही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथक अमली पदार्थांची माहिती घेत असताना शेवगाव येथील हदगाव शिवारात मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणलेल्या गांजाचा साठा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकण्यात आला. बडे याच्या घराशेजारी जनावरांच्या गोठ्यामध्ये असलेल्या दोन मोटारीत एकूण ६६.७१० किलो वजनाचा गांजा, दोन मोबाईल, एक मोटरसायकल व दोन मोटारी जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी अनिल बडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गांजा मध्यप्रदेशमधील मोतीराम याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तो व त्याचे वडील बाबासाहेब बडे असे दोघे मिळून स्थानिक परिसरात गांजा विक्री करत होते. या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार शिवाजी ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहायक निरीक्षक तुषार धाकराव व अशोक काटे, उपनिरीक्षक महाले, अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन मुंडे, आदिनाथ शिरसाठ, मारुती पाखरे, किशोर काळे, संभाजी घायतडक, पांडुरंग मनाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.