अहिल्यानगर : पहेलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पावले उचलत ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने अहिल्यानगरमध्ये घेतलेल्या शोधमोहिमेत १४ पाकिस्तानचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याचे आढळले आहे. या १४ जणांमध्ये १ पुरुष व १३ महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला पाकिस्तानच्या नागरिक असून, त्या विवाह करून भारतात आल्या आहेत. त्याचबरोबर एक पुरुष पाकिस्तानचा नागरिक असून, तो भारतीय महिलेशी विवाह करून आलेला आहे. या १४ जणांपैकी केवळ तिघांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केलेला आहे. मात्र ते विविध कारणांमुळे अद्याप प्रलंबित आहेत.

केंद्र सरकारने विविध कारणांसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचा आदेश जारी केला आहे. काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार, हा आदेश दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्या नागरिकांना लागू नाही. तो केवळ सार्क व्हिसा व अल्प मुदतीच्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना लागू आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या १४ पाकिस्तानी नागरिकांपैकी ११ जण अहिल्यानगर शहरात, तर तीन जण श्रीरामपूर शहरातील आहेत. एक महिला १९५९ मध्ये अहिल्यानगरमध्ये आलेली आहे. सर्वांत अलीकडे पाकिस्तानहून अहिल्यानगर शहरात आलेली महिला २०११ मध्ये आलेली आहे.

चौदापैकी काही जण हिंदू आहेत.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक निर्बंध पाकिस्तानसाठी जारी केले होते. त्यानंतर सन २०१८ पासून अल्पमुदतीच्या व्हिसावर एकही पाकिस्तानी नागरिक अहिल्यानगर जिल्ह्यात आलेला नाही. दीर्घ मुदतीच्या व्हिसावर अहिल्यानगरमध्ये आलेल्या १४ जणांच्या व्हिसाची मुदत वेळोवेळी वाढवली गेली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात दीर्घ मुदतीच्या व्हिसावर पाकिस्तानचे १४ नागरिक वास्तव्य करीत आहेत. त्यामध्ये १ पुरुष आणि १३ महिला आहेत. त्यांच्या व्हिसाची मुदत वेळोवेळी वाढवली आहे. सध्याच्या देश सोडण्याच्या आदेशात दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा समावेश नाही.राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक

नागरिकत्वाचे तीन अर्ज प्रलंबित

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघा पाकिस्तानी नागरिकांनी भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. विविध त्रुटींअभावी ते प्रलंबित आहेत.