कर्जत : उजनी धरणांमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ८० दिवसांचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र या आवर्तनास अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या शेतकऱ्यांनी आवर्तन बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. उजनी धरण हे भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी गावाजवळ बांधण्यात आले आहे. भीमाशंकर ते उजनी असे २५० किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून ते पाणी उजनी धरणात येते. भीमा खोऱ्यातील १९ लहान मोठ्या धरणांमधून ते येत आहे.पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांसाठी भीमा नदी ही शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील सिद्धटेक, बेरडी ,जलालपूर ,भांबोरा, दुधोडी, गणेशवाडी, खेड ,आवटेवाडी, शिंपोरा ,बाभूळगाव, मानेवाडी, वायसेवाडी , या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी उजणी धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामध्ये गेल्या आहेत. भीमा नदी पात्रालगत असणारे ही सर्व गावे पावसाळ्यामध्ये पुराचा धोका सहन करतात. काही गावांचे तर स्थलांतर देखील करण्यात आले आहे.मात्र उन्हाळ्यामध्ये याच गावांना उजनी धरणा मधून मोठया प्रमाणात पाणी सोडून दिल्यानंतर मागील काही वर्षांपासून पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होत आहे. मागील वर्षी कर्जत तालुक्यातील भीमा नदीचे पात्र संपूर्णपणे कोरडे पडले होते. यामुळे या शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. पाण्याअभावी पिके जळून गेली. तसेच पिण्याच्या पाण्याची देखील गंभीर समस्या निर्माण झाली होती.

मागील वर्षी सारखीच या वर्षी देखील परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे. भीमा नदी पात्रातील पाण्याची पातळी उजनी धरणा मधून आवर्तन सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्याने खाली जात आहे. हे आवर्तन बंद केले नाही तर पुढील काही दिवसातच पुन्हा एकदा हे सर्व भीमा नदीचे पात्र कोरडे ठाक होईल.

या भीतीने आज कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना उजनी धरणा मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये ८० दिवसाचे पाच दरवाजा मधून सुरू असलेल्या आवर्तन तात्काळ बंद करावे असेल लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की ,आम्ही उजनी धरणातील मूळ धरणग्रस्त आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये धरणांमधून पाणी सोडताना आमचा विचार केला जात नाही. जर पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये खाली गेली तर शेतकऱ्यांच्या पिकाच्या पिण्याच्या, तसेच माणसांच्या व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. ऊस ,केळी ,द्राक्ष ही सर्व पिके संकटात सापडली आहे. यामुळे भीमा नदी पात्रात कर्जत तालुक्याच्या हद्दीमध्ये बुडीत बंधारा व्हावा अशी आमची अनेक वर्षांपासून ची मागणी आहे. हा बंधारा जर झाला तर त्यामध्ये साठणारे पाणी हे शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे. असा बंधारा नसल्यामुळे सर्व पाणी वाहून जाते . आणि नदीचे सर्व पात्र कोरडे पडते. यामुळे धरणा मधून सुरू असलेले आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, व जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. जर हे आवर्तन तात्काळ थांबवले नाही, तर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते युवराज हाके यांच्या नावाने देण्यात आले असून, या निवेदनावर युवराज हाके, लालासाहेब काळे नानासाहेब झगडे अशोक खिलारे शिवाजी काळे दत्तात्रय विंड रामदास तांदळे तानाजी साळुंखे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार गुरु बिराजदार यांनी यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास तात्काळ पत्रव्यवहार करू असे आश्वासन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.