अहिल्यानगर : जिल्ह्यात गावातील ग्रामपंचायत कार्यालयाप्रमाणे प्रत्येक गावात आता महिला बचत गटांच्या ग्रामसंघांचेही स्वतंत्र कार्यालय उभारण्यास सुरुवात झाली आहे. महिला बचतगटांचे एकुण ११७४ महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आली आहेत. त्यातील ७५५ ग्रामसंघांना जिल्हा परिषदेने स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. भविष्यात हे ग्रामसंघ ‘मिनी बँक’ म्हणून काम करणार आहेत. स्वतंत्र कार्यालयांमुळे बचत गटांच्या सक्षमीकरणाला गती मिळत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषद व जिल्हा उमेद अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बचतगटांचे मोठे जाळे तयार झाले आहे. जिल्ह्यात एकूण २७ हजार ३२४ महिला बचत गट तयार झाले आहेत. या गटांतून सुमारे ३ लाखांपेक्षा अधिक महिलांचा सहभाग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन तयार झाले आहे.
बचतगटांना बँकांमार्फत कर्जही उपलब्ध करून देण्यात येते तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातूनही महिलांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी उपलब्ध करून देण्यात येतो.उमेद अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये महिला बचतगटांचा मिळून एक ग्रामसंघ तयार करण्यात आला आहे. या ग्रामसंघाच्या माध्यमातून गावाच्या विकासयोजना आखण्यासाठी महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. भविष्यात ग्रामसंघ हे ‘मिनी बँक’ म्हणून काम करणार आहेत. या ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांना अडचणीच्या काळात कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात एकूण ११७४ महिला ग्रामसंघ तयार झाले आहेत. त्यामुळे महिलांचा ग्रामपंचायतीमधील कार्यक्रमात सहभाग वाढला आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी सुरू केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमात महिला बचतगटांना अधिक सक्षम करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यातूनच महिला बचतगटांच्या ग्रामसंघाला गावात कार्यालय उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे ७५५ ग्रामसंघांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यालय उपलब्ध झाले. अभियानमार्फतही या ग्रामसंघांना कार्यालयासाठी स्वतंत्र निधी देण्यात आला. त्यामुळे महिलांना त्यांच्या मासिक बैठकांसाठी हक्काची जागा मिळाली, त्यातूनच महिला ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेत पुढे येत आहेत. ग्रामसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढला. गावात ग्रामपंचायतीप्रमाणेच महिला बचतगटाचेही स्वतंत्र कार्यालय झाल्याने त्याचा महिला सक्षमीकरणासाठी उपयोग होत आहे. उर्वरित सर्वच ग्रामसंघांनाही कार्यालय उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी मॉल तयार करण्यात येणार आहे.
आमच्या हक्काच्या कार्यालयामुळे प्रोत्साहन
जिल्हा परिषदेच्या मिशन पंचसूत्री अंतर्गत आमच्या शिवबा महिला प्रभागसंघाला (दरेवाडी, ता. अहिल्यानगर) कार्यालय उपलब्ध झाले. या कार्यालयाचा उपयोग महिला बचतगटांच्या बैठका व इतर सामाजिक उपक्रमासाठी आम्ही करतो. आमच्या हक्काच्या कार्यालयामुळे गावातील बचतगट चळवळीस प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
मेघा वाघ, अध्यक्ष शिवबा महिला प्रभागसंघ. (दरेवाडी, अहिल्यानगर).