संगमनेर : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या देऊन बसलेल्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने संगमनेरातील वातावरण अधिकच चिघळले. मला न्याय द्यायचा सोडून माझ्यावरच गुन्हा दाखल होत असेल तर हा उफराटा न्याय असून महाराष्ट्रात खरंच महिला व मुली सुरक्षित आहेत का ? असा संतप्त सवाल आज त्यांनी केला. दरम्यान पोलिसांनी आरोपी देशमुख यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

शुक्रवारी रात्री धांदरफळ येथील डॉ. सुजय विखे यांच्या सभेत देशमुख यांनी डॉ. थोरात यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद उमटून त्याच रात्री विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर काल, शनिवारी पोलीस ठाण्यासमोर निषेध सभा झाली. यावेळी जमाव जमवून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत डॉ. थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व विश्वास मुर्तडक, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंद्रजीत थोरात आणि दुसऱ्या कन्या शरयू देशमुख, शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार प्रभावती घोगरे, श्रीरामपूर विधानसभेचे उमेदवार हेमंत ओगले, वंचित आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते, संगमनेर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, श्रीरामपूर येथील करण ससाणे व त्यांच्या पत्नी दिपाली, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, आदी पंचवीस प्रमुख कार्यकर्त्यांवर निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल झाले.

हेही वाचा – Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!

गुन्हे दाखल झाल्याबाबतची माहिती मिळताच डॉ. थोरात, दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील शिवाजी पुतळ्यापासून या घटनेच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा काढण्यात आला. पोलीस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर डॉ. थोरात म्हणाल्या, मला न्याय द्यायचा सोडून माझ्यावरच गुन्हे दाखल होतात हा कुठला प्रकार आहे. खरंच महाराष्ट्रात मुली आणि महिला सुरक्षित आहेत का असा मोठा प्रश्न आहे. माझ्याविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी रात्रभर आंदोलन केले, तरी कोणतीही नोंद घेतली गेली नाही. आम्ही लोकशाही मार्गाने मागणी करतो तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात. माझ्या संरक्षणार्थ उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा मलाच अटक करा अशी भूमिका त्यांनी घेतली.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, शांततेच्या मार्गाने कायदेशीर मागणी करणे हा गुन्हा आहे का? येथे कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही हाच हा प्रश्न आहे. मणिपूर आणि बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती झाली असल्याची टीका त्यांनी केली. याप्रसंगी जमलेल्या महिलांनी संताप व्यक्त करत खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा दिला.

देशमुख पोलिसांच्या ताब्यात

जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख यांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी बारा पथके तयार केलेली होती. त्यातील एका पथकाने आज दुपारी देशमुख यांना ताब्यात घेतले. परंतु त्यांना नेमके कुठून अटक केली याबाबतची माहिती मिळाली नाही.

वाघाचे कातडे पांघरले म्हणजे कोणी वाघ होत नाही – खासदार लंके

थोरात घराणे हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व अत्यंत सुसंस्कृत घराणे आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन विकासाचा मार्ग दाखवणारे हे घराणे आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलीबद्दल बेताल वक्तव्य करणे ही घटना महाराष्ट्राला कलंकित करणारी दुर्दैवी घटना आहे. अंगावर वाघाचे कातडे घेतले म्हणून एखादे मांजर वाघ होत नाही, अशी घाणाघाती टीका करतानाच यांच्या दडपशाहीमुळेच नगर दक्षिणमधील जनतेने लोकसभेमध्ये यांची जिरवली अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली. धांदरफळ घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये येत जयश्री थोरात यांची त्यांनी भेट घेतली.

हेही वाचा – Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?

गुन्ह्यात पोलीस अधीक्षकांचे नाव नाही – उत्कर्षा रूपवते यांचा खोचक टोला

‘समस्त समाजाला लाजवणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध सभेसाठी उपस्थित राहिलेल्या आम्हा सर्वांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच सभेला नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही संबोधित केले. त्यांचे नाव मात्र गुन्ह्यात कुठे दिसले नाही. लाजिरवाणी राजकारण ! ‘ असा खोचक टोला मारणारी प्रतिक्रिया वंचित आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी एक्स या समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.