लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि भाजपात इनकमिंग वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचा आश्वासक चेहरा अशी ओळख असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. महाविकास आघाडी ते सोडणार नाहीत असं वाटत असतानाच त्यांनी आपली वाट निवडली. काँग्रेसला आता आणखी खिंडार पडणार का? याच्याही चर्चा राज्यपातळीवर होत आहेत. आजच राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा होती. मात्र ती त्यांनी फेटाळली. आता बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी टोला लगावला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य भुवया उंचावणारं
राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र ते आधी काँग्रेसमध्ये होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपात प्रवेश केला होता. त्याआधी खासदार सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात एकाच पक्षात असताना दोघांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याची अशी चर्चा नेहमी त्यावेळी होत असे. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांचं थेट नाव घेतलेलं नाही तरीही राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बाळासाहेब थोरातांकडेच अंगुलनिर्देश
बाळासाहेब थोरातही भाजपाच्या वाटेवर आहेत का? या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. भाजपा नेत्यांसह खरंच जिव्हाळ्याचे संबंध आहेत का? तसं काही असेल तर या संबंधातून आगामी काळात काही राजकीय कनेक्शन निर्माण होऊ शकतं का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. कारण राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्यच सूचक आहे.
हे पण वाचा- अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर महाराष्ट्रातले काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला, पडद्यामागे हालचाली?
“काही लोक भाजपा नेत्यांचे पाय धरतात”
“राजकीय प्रक्रिया निरंतर सुरु असते. प्रवेश कुणाला द्यायचा कुणाला नाही हे वरिष्ठ ठरवत असतात. काही लोकांनी भाजपात येण्याची भूमिका घेतली. तर नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपा नेत्यांचे पाय धरतात. हा फरक शेवटी असतोच.” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांचं नाव घेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा टोला लगावला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातले काही लोक असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांचा अंगुलीनिर्देश हा बाळासाहेब थोरात यांच्याकडेच आहे यात शंकाच नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तीन नेते महायुतीत आले आहेत. मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तर अशोक चव्हाण भाजपात. त्यामुळे आता चौथा धक्का बाळासाहेब थोरातांच्या रुपाने मिळणार का? या चर्चा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे सुरु झाल्या आहेत.