अकोले : भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्रातिल घाटघर येथील पावसाने आज पाच हजार मिमीचा टप्पा ओलांडला. तेथे आजपर्यंत ५ हजार ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा पाऊस मागील दोन महिन्यांतील आहे. भंडारदराचे पाणलोट क्षेत्रात सर्वच ठिकाणी या वर्षी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे भंडारदरा धरणात क्षमतेच्या जवळपास दुप्पट म्हणजे वीस टीएमसी पाण्याची आजपर्यंत आवक झाली. भंडारदरा धरण महिनाभरापूर्वीपासून भरून वहात आहे.
सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर, कळसुबाई आणि रतनगड यांच्या डोंगर रांगेतील अवघे १२२ चौ.कि. भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. या पाणलोटात कोकणकड्यानजीक असणाऱ्या घाटघरचा परिसर हा अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात तेथे सरासरी साडेपाच हजार मिमी. पाऊस पडत असतो. तर पाणलोटात इतरत्र तीन ते पाच हजार मिमी पाऊस पडतो.
भंडारदरा पाणलोटात घाटघर, रतनवाडी, पांजरे व भंडारदरा येथे पर्जन्यमापन केंद्रे आहेत. मात्र भंडारदरा वगळता अन्य तीन ठिकाणचे पर्जन्यमापक बिघडल्यामुळे एक जूनपासून तेथील पावसाचे मोजमाप होऊ शकले नाही. पर्जन्यमापकाच्या दुरुस्तीनंतर घाटघर व पांजरे येथे ५ जुलैपासून तर रतनवाडीला ६ जुलैपासून पर्जन्यमापन सुरू झाले. ५ जुलै ते ७ सप्टेंबरपर्यंतच्या ६५ दिवसांत घाटघर येथे ५ हजार ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
चार ऑगस्टला घाटघर येथे ४७५ मिमी पावसाची नोंद झाली. हा एका दिवसातील तेथील सर्वाधिक पाऊस. घाटघर येथे प्रत्येकी एक दिवस चारशे व तिनशे मिमीपेक्षा जास्त तर तीन दिवस दोनशे मिमीपेक्षा अधिक पाऊस तेथे कोसळला.
घाटघरचा हा परिसर, तेथील कोकणकडा, त्या लगतची दरी हा सर्व परिसर पावसाळ्यात दिवसातील बराच वेळ दाट धुक्यात हरवलेला असतो. दाट धुक्याच्या सोबतीने टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊस अनुभवायला पावसाळ्यात तेथे पर्यटकांचा ओघ सुरू असतो. भंडारदराचे पाण्याचा लाभ नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, रहाता या तालुक्यांना मुख्यतः होतो. रतनगडावर अमृतवाहिनी म्हणून ओळखली जाणारी प्रवरा नदी उगम पावते. या गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रतनवाडीमध्येही घाटघरसारखाच पाऊस पडत असतो. या वर्षी ६ जुलैपासून तेथील पर्जन्याचे मोजमाप सुरू झाले. सहा जुलै ते ७ सप्टेंबर या कालावधीत रतनवाडीला ४ हजार ६२० मिमी पाऊस कोसळला. ४ ऑगस्टला घाटघर प्रमाणेच येथेही ४४९ मिमी असा विक्रमी पाऊस पडला आहे.
रतनवाडी येथे अकराव्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. तर रतनवाडीच्या वाटेवर अनेक नयनरम्य धबधबे पावसाळ्यात कोसळत असतात. त्या मुळे घाटघर भंडारदराला भेट देणारे पर्यटक आवर्जून रतनवाडीचीही वाट पकडतात. ३ हजार ९०६ मिमी पावसाची नोंद झालेल्या पांजरे येथेही घाटघर रतनवाडी सारखाच पाऊस पडला.
पाणलोटातील या मुसळधार पावसामुळे ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट क्षमतेच्या भंडारदरा धरणात आजपर्यंत क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त म्हणजे २० हजार ६२९ दशलक्ष घनफुट नवीन पाणी आले. धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी ३ ऑगस्टपासूनच धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. आज भंडारदरा धरणाचा जलसाठा शंभर टक्के आहे. नुकतेच या धरणाचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करण्यात आले आहे.
भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत सोडलेले पाणी याच तालुक्यात असणाऱ्या निळवंडे धरणात जमा होते. आजपर्यंत ८ हजार ३२० दशलक्ष घनफुट क्षमता असणाऱ्या निळवंडे धरणात १९ हजार ६८६ दशलक्ष घनफुट नवीन पाणी जमा झाले. निळवंडे धरणात आज ९८.७७ टक्के पाणीसाठा होता. गत महिनाभरापासून निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. प्रवरा समूहातील आढळा (क्षमता १०६० दशलक्ष घनफुट) आणि म्हाळुंगी नदीवरील भोजापूर (क्षमता ३६१ दशलक्ष घनफुट) ही दोन्ही छोटी धरणेही भंडारदरा प्रमाणेच शंभर टक्के भरली आहेत.