अहिल्यानगर : अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेला यंदा ७ कोटी ३ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. नफ्यातून सभासदांना १५ टक्के लाभांश व सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस बँकेकडून दिले जाणार आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी ही माहिती दिली. बँकेचे व्यवहार अधिक सुलभ पद्धतीने करता यावे त्यासाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना ५१०० रुपयांची ठेव पावती देण्यासाठी सहकार विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. सहकार विभागाने सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यास सांगितली आहे. येत्या सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, बँकेला गत वर्षात ३९ कोटी १५ लाखांचा नफा झाला. करोनानंतर तीन वर्षांनी शून्य एनपीए झाला आहे. सर्व तरतुदी वगळून ७ कोटी ३ लाखांचा नफा झाला आहे. १३७ कोटींची वसुली अद्याप बाकी असली तरी नफ्यातून एनपीएची तरतूद केल्याने एनपीए शून्य टक्के झाला आहे. त्यामुळे बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळेल व बँकिंग सुविधा आणखीन वाढवता येतील.
यंदा नियमित कर्जफेड करणाऱ्या ७० टक्के कर्जदारांना २६ कोटी ८७ लाखांची व्याज सवलत (रिबेट) देण्यात आली आहे. बँकेच्या ठेवीत ८१ कोटींची वाढ होऊन १४६२ कोटी १६ लाखांच्या ठेवी झाल्या आहेत. एकूण कर्ज ९६८ कोटी ३९ लाख वितरित करण्यात आले. इतर कोणत्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा मर्चंट बँकेचे कर्ज व्याजदर कमी असल्याचा दावाही हस्तीमल मुनोत त्यांनी केला.बँकेच्या एकूण १८ शाखा आहेत, सर्व शाखा नफ्यात आहेत. एकूण १९६ कर्मचाऱ्यांना ११ हजाराचे बक्षीस मिळणार आहे.
यावेळी संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, मोहनलाल बरमेचा, किशोर गांधी, संजय बोरा, संजीव गांधी, कमलेश भंडारी, किशोर मुनोत, सुभाष बायड, मीना मुनोत, प्रमिला बोरा, विजय कोथिंबिरे, सुभाष भांड, जितेंद्र बोरा, प्रसाद गांधी आदी उपस्थित होते.
कार्पोरेट बँकिंगकडे वाटचाल
बँकेचा एनपीए शून्य झाल्यामुळे आणखीन चार ते पाच शाखा सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्वे सुरू आहे. बँकेने सन २०१९ मध्ये डिजिटल सेवेत प्रवेश केला. आता कार्पोरेट बँकेकडे वाटचाल सुरू आहे. त्यादृष्टीने आणखी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामध्ये मोबाइल मल्टिपल यूजर सुविधा, पेमेंट गेटवे प्रकल्प, स्विपिंग इन व स्विपिंग आऊट डिपॉझिट सुविधांचा समावेश असल्याची माहिती उपाध्यक्ष अजय मुथा यांनी दिली.