कर्जत : श्रीगोंदा शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन विक्रीसाठी आलेल्या दोन बहिण भावांमध्ये हाणामारी झाली. प्रॉपर्टीच्या वादातून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हा वाद विकोपाला जाऊन थेट अधिकाऱ्यांसमोरच हातघाईवर विषय आला. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली, तर बघ्यांची मोठी गर्दीही उसळली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या बाबत घडलेली घटना अशी की, संबंधित भाऊ, बहीण आपल्या कौटुंबिक मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. मात्र, दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला हा वाद केवळ तोंडी भांडणापुरताच मर्यादित होता, पण काही क्षणांतच तो वाढत गेला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना त्यांनी परस्परांना मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा कार्यालयात मोठा गोंधळ उडाला असता.