अहमदनगर: मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये वर्चस्व होते. मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यामधून हद्दपार झाला असता परंतु रोहित पवार यांच्या विजयामुळे या पक्षाचे अस्तित्व नगर जिल्ह्यामध्ये राहिले आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीत रोहित पवार यांनी एक हजार २४३ मतांनी विजय मिळवला आहे. यात रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ तर आमदार राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी रात्री सव्वासात वाजता निकाल जाहीर केला. मात्र या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्या नावाने जो डमी उमेदवार उभा केला होता आणि त्याला तुतारी सारखे दिसणारे चिन्ह दिले होते त्याला तब्बल ३७४४ मते मिळाली आहेत. या चिन्हामुळे आणि नाव साधर्म्य असल्यामुळे रोहित पवार यांना चांगलाच धोका निर्माण झाला. राम शिंदे यांची जे दोन डमी उमेदवार होते त्यांना मात्र अतिशय नगण्य मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये रोहित पवार यांना मिळालेली ५५४ मतांची आघाडी अतिशय महत्त्वपूर्ण आणि निकालामध्ये निर्णयक ठरली.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ राज्यातील सर्वात लक्ष वेधले होते. कोण बाजी मारणार या बाबत शेवटच्या फेरी पर्यंत उत्सुकता होती. प्रत्येक फेरीत चित्र बदलत होते. सुरवातीला पहिल्या फेरीत रोहित पवार आघाडीवर होते. नंतर राम शिंदे यांनी मुसंडी मारत आघाडी घेतली. पुढील काही फेऱ्यात पुन्हा रोहित पवार यांनी आघाडी घेतली. नंतर पुन्हा राम शिंदे यांनी आघाडी घेतली. आणि शेवटच्या २६ व्या फेरी मध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. शेवटच्या बॉल वर सिक्सर मारून मॅच जिंकली असा हा निकाल लागला आहे.
जल्लोष कार्यकर्त्यांचा…
विधान सभा निवडणुकीची मतमोजणी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय येथील शूटिंग हॉल मध्ये झाली. मत मोजणी साठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी परिसरात असणारा कर्जत वालवड रोड वाहतूकसाठी बंद करण्यात आला होता.
मत मोजणी पहिल्या फेरीत रोहित २८८ मतांची आघाडी घेतली मात्र दुसऱ्याच फेरीत राम शिंदे यांनी ६३४ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी तिसऱ्या १५४६ अशी वाढली आणि सहा फेऱ्यांपर्यंत राम शिंदे आघाडीवर होते. जेव्हा जामखेड तालुक्याची मतमोजणी सातव्या फेरीमध्ये सुरू झाली, त्यावेळी राम शिंदे यांची आघाडी तोडून ६३८ मतांची रोहित पवारांना आघाडी मिळाली. त्यांची ही आघाडी तेराव्या फेरीपर्यंत होती मात्र चौदाव्या फेरीमध्ये पुन्हा कर्जत तालुका सुरू झाला आणि राम शिंदे यांनी रोहित पवार यांची आघाडी मोडून १८४ मतांची आघाडी घेतली. यानंतर १९ व्या फेरीपर्यंत राम शिंदे हे आघाडीवर होते. विसाव्या फेरीमध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांची आघाडी तोडून २८५ मतांची राशीन जिल्हा परिषद गटामध्ये आघाडी घेतली. बाविसाव्या फेरीत राम शिंदे यांनी पुन्हा आघाडी घेतली. त्यांनी ती २५ व्या फेरीपर्यंत टिकवली मात्र शेवटच्या २६ व्या फेरीमध्ये रोहित पवार यांनी आघाडी घेत विजय मिळवला.
दोन्ही गट शेजारी – शेजारी
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्राच्या बाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. दोन्ही गट शेजारी शेजारी आल्यामुळे या दोन्ही गटांच्या मध्ये पोलीस साखळी करून उभा राहिले होते. ज्या गटाचा उमेदवार पुढे जाहीर होईल तो गट दुसऱ्यांच्या समोर जाऊन जल्लोष करत होताना या सर्वांना आवरताना पोलिसांची मात्र तारेवरची कसरत सुरू होती.
फेर मतमोजणीची मागणी फेटाळली
मतमोजणीचा निकाल जाहीर झाला रोहित पवार यांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी केल्यानंतर राम शिंदे यांची फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती नाकारली असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. अशाप्रकारे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रथमच अशा पद्धतीने ऐतिहासिक आणि चुरशीची झाली. कर्जत जामखेड विधानसभा मतदार सघाच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये एवढ्या कमी मताच्या फरकाने निवडणूक जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे. यावेळी प्रत्येक मताला किती महत्त्व आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ज्या गावामध्ये आपल्या नेत्याला लीड मिळाले आहे ते कार्यकर्ते उत्साहाने मिरवताना देखील दिसून येत होते. मात्र जसजसे मतमोजणी पुढे पुढे जात होते तसा कोणालाही कोणताच अंदाज येत नव्हता. दोघेही समर्थक जल्लोष करत होते. अनेकवेळ कोण विजयी झालेले आहे हे देखील लक्षात येत नव्हते. काही वृत्तवाहिन्यांनी तर राम शिंदे यांना विजयी देखील घोषित केले होते. अशाप्रकारे जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी व चुरशीची निवडणूक कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये संपन्न झाली.