अहमदनगर: मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये वर्चस्व होते. मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यामधून हद्दपार झाला असता परंतु रोहित पवार यांच्या विजयामुळे या पक्षाचे अस्तित्व नगर जिल्ह्यामध्ये राहिले आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. शेवटच्या फेरीत रोहित पवार यांनी एक हजार २४३ मतांनी विजय मिळवला आहे. यात रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ तर आमदार राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी रात्री सव्वासात वाजता निकाल जाहीर केला. मात्र या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्या नावाने जो डमी उमेदवार उभा केला होता आणि त्याला तुतारी सारखे दिसणारे चिन्ह दिले होते त्याला तब्बल ३७४४ मते मिळाली आहेत. या चिन्हामुळे आणि नाव साधर्म्य असल्यामुळे रोहित पवार यांना चांगलाच धोका निर्माण झाला. राम शिंदे यांची जे दोन डमी उमेदवार होते त्यांना मात्र अतिशय नगण्य मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये रोहित पवार यांना मिळालेली ५५४ मतांची आघाडी अतिशय महत्त्वपूर्ण आणि निकालामध्ये निर्णयक ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा