कर्नाटकच्या अथणी तालुक्यातील एड्सबाधित महिलांचे बाळंतपण करण्यास नकार मिळत असल्याने सांगली, मिरजेच्या शासकीय रुग्णालयात त्या दाखल होत असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी दिली. एड्सबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी राज्यात सांगली अद्याप दुस-या स्थानावरच असल्याचेही उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.
कर्नाटकातील सीमावर्ती भागातील वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णांचा मोठा ओढा सांगली व मिरजेकडे असला तरी एड्सबाधित रुग्णांवर उपचार करीत असताना कर्नाटकातील रुग्णालयातून दुजाभाव केला जात असल्याचे आढळून आले आहे. जानेवारीपासून गेल्या १० महिन्यांत शासकीय रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या ४५ हजार ४९२ महिलांची रक्ततपासणी करण्यात आली. यापकी ५१ महिला एड्सबाधित असल्याचे आढळून आले. मात्र यापैकी १३ महिला या अथणी तालुक्यातील असून, बाळंतपणासाठी त्या तेथील रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्या ठिकाणी या महिलांचे बाळंतपण करण्यास नकार देण्यात आल्याने त्या सांगलीच्या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.
एड्सबाधित रुग्णांची संख्या गेल्या दहा महिन्यांत ११९४ असल्याचे आढळून आले असून, असे रुग्ण आढळण्याचे प्रमाण आता २ टक्क्यांवर आले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण सर्वाधिक आढळून आले असून दुसरा क्रमांक सांगलीचा आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू असून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या १० महिन्यात सांगलीत ५५ हजार ४३० रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यापकी १ हजार १९४ रूग्णांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांचे मनोबल अबाधित ठेवण्यासाठी समुपदेशनही करण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यात २९ एड्सबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचेही दिसून आले आहे.