एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सध्या जेलमध्ये असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या निमित्ताने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांसाठी शरद पवार पंतप्रधानांना भेटतात मग नवाब मलिक यांच्यासाठी का नाही? असा सवाल ओवेसींनी विचारला आहे. ओवेसी भिवंडीमधील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुघलांवरुन मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही केला.
ओवेसी यांनी यावेळी ज्ञानव्यापी तसंच ताजमहालच्या मुद्द्यांवरुन हल्लाबोल केल. तसंच मुस्लिमांची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. हलाल, हिजाब, अजाना सगळ्यांवर यांना आक्षेप आहे अशी टीका ओवेसींनी केली. ओवेसींनी महागाईच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला घेरलं.
भारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या? : असदुद्दीन ओवेसी
ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी पंतप्रधान आणि सध्या देशाचे बादशाह होऊन बसलेले नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संजय राऊतांवर कारवाई करु नका सांगितलं. त्यांना जेलमध्ये टाकू नका, कारवाई करु नका यासाठी सांगितलं. पण त्यांना नवाब मलिकांची आठवण का झाली नाही ? हे मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना विचारायचं आहे”.
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा; ओवैसी म्हणाले, “आता पुन्हा एकदा मशीद…”
“नवाब मलिकांचं नाव का घेतलं नाही? देशाच्या पंतप्रधानांना भेटत असताना तुमच्याच पक्षाचे नवाब मलिक यांच्याबद्दलही बोलायचं ना,” असं ओवेसी म्हणाले. “नवाब मलिक संजय राऊतांपेक्षा कमी आहेत का? मला शरद पवारांना विचारायचं आहे की, तुम्ही नवाब मलिकांसाठी का बोलला नाहीत? ते मुस्लिम आहेत म्हणून का? ते आणि संजय राऊत समान नाहीत का?,” अशी विचारणाही ओवेसींनी केली.
“भारत ठाकरे, मोदी शाह यांचा नाही”
“भारत ना माझा आहे, ना उद्धव ठाकरेंचा आहे, ना मोदी, अमित शाह यांचा आहे. भारत जर कोणाचा असेल तर द्रविडियन आणि आदिवसींचा आहे. पण भाजपा आणि आरएसएस फक्त मुघलांच्या मागे लागले आहेत. आफ्रिका, इराण, मध्य आशिया, पूर्व आशियामधूनही लोक आले होते. हे सर्व लोक एकत्र आले आणि भारत निर्माण झाला. पण आदिवासी आणि द्रविडियन येथील आहेत. आर्यन चार हजार वर्षांपूर्वी आले होते,” असं ओवेसींनी यावेळी सांगितलं.
“…तर आर्यांचा इतिहास काढू”
“जर तुम्ही ७००, ६०० वर्षांपूर्वीचं बोललात तर मी ६५ हजार वर्षांपूर्वीच्या तारखेवर बोलण्यास तयार आहे,” असं आव्हान यावेळी ओवेसींनी दिलं. “ताजमहालच्या तळघरात काय आहे पाहणार म्हणतात, आता तर आग्राच्या किल्ल्यात मशीद आहे त्याच्या खाली खोदकाम करणार आहेत. मला तर वाटतं भाजपा-आरएसएसवाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री शोधण्यासाठी खोदकाम करत आहेत. मशिदीच्या बहाण्याने डिग्री मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत,” असा टोला ओवेसींनी लगावला.