आमचा हिंदूंना अजिबात विरोध नाही. हिंदू समाजाबरोबर बंधुभावाचे, सलोख्याचे संबंध ठेवू इच्छितो. परंतु आमचा विरोध हिंदूराष्ट्रवाद्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही मुस्लीम समाजाला न्याय न देता केवळ मतपेटीसाठी त्यांचा वापर केला, असा आरोप ऑल इंडिया इत्तेहादूल मुसलमीनचे (एआयएमआयएम) नेते, आमदार अकबरोद्दीन ओवैसी यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी ओवैसी हे सोलापुरात आले होते. होम मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी सुमारे ७५ मिनिटांच्या भाषणात संघ परिवार, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. या सभेसाठी सुमारे ३० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. यात तरूणांची संख्या उल्लेखनीय होती.
ओवैसी हे सोलापुरात दाखल होऊन थेट होम मैदानावर सभेच्या व्यासपीठावर पोहोचताच स्थानिक पोलिसांनी त्यांना जातीय तणाव निर्माण करणारे आणि अन्य धर्मीयांच्या भावना भडकावणारे भाषण न करण्यासाठी नोटीस बजावली होती. ओवैसी यांनीही आपल्या संपूर्ण ७५ मिनिटांच्या भाषणात कायद्याच्या कचाटय़ात सापडणारे आक्षेपार्ह वक्तव्य न करता भान ठेवून विधाने केल्याचे दिसून आले.
देशात २५ कोटी मुसलमान अन्याय सहन करता संघटित झाले तर त्यांची स्थिती वेगळी राहिली असती, असे सांगताना ओवैसी यांनी, देशातील झोपलेल्या मुस्लिमांना जागे करण्यासाठीच कदाचित अल्लाहने बाबरी मशीदकांड घडविले असावे, असे वक्तव्य केले.
स्वातंत्र्यानंतर देशात ५० हजार जातीय दंगली होऊन त्यात मुसलमान समाजावर मोठा अन्याय झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ साली हैदराबाद संस्थान देशात सामील करण्यासाठी ‘पोलीस अॅक्शन’च्या नावाखाली त्या भागातील मुसलमानांवर प्रचंड अत्याचार झाले. त्यात दीड लाख मुसलमानांची कत्तल केली गेली. त्यांना आर्थिकदृष्टय़ा गुलाम करण्यात आले. महिलांची अब्रू लुटण्यात आली. त्याच काळात एमआयएमची उभारणी झाली. ही संघटना केवळ राजकारणासाठी नाही तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला.
देशात दलित वर्ग प्राचीन काळात अस्तित्वात नव्हता. मध्ययुगीन काळात परकीयांच्या आक्रमणानंतर ही स्थिती उद्भवल्याचे संघ परिवार सांगतो. त्याचा समाचार घेताना ओवैसी यांनी, जर संघ परिवाराला दलित समाजाविषयी खरोखर कळवळा असेल तर  शंकराचार्याच्या गादीवर एखाद्या दलिताची नेमणूक का केली जात नाही, असा सवाल केला. मुस्लिमांबरोबर दलित समाजाच्या न्याय हक्कासाठी आपली संघटना कटिबध्द असल्याचा दावाही त्यांनी केला.
देशात मोठय़ा प्रमाणात जातीय दंगली उसळत असताना काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तयार केलेले जातीय हिंसाचार विरोधी विधेयक का मंजूर केले नाही, त्यावेळचे लोकसभा सभागृह नेते व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जबाबदारी महत्त्वाची असताना त्यांनी ती का पार पाडली नाही, असा सवाल त्यांनी केला.
उमेदवारी गुलदस्त्यात…
एमआयएम संघटना सोलापूरच्या विधानसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उतरणार असून त्यासाठी काँग्रेसमधून बाहेर पडलेले तौफिक शेख हे उमेदवारीचे दावेदार समजले जातात. ओवैसी यांच्या जाहीर सभेचे नियोजन त्यांनीच केले होते. परंतु प्रत्यक्षात जाहीर सभेत बोलताना ओवैसी यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलाच नाही. त्यामुळे उमेदवार कोण हे अद्यापि गुलदस्त्यातच राहिले आहे. तौफिक शेख हे बाहुबली नेते असून त्यांनी काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांच्या प्रेरणेतून राजकारणात पदार्पण केले होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीत कोठे यांचे पुत्र महेश कोठे हे काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत गेले व उमेदवारीची तयारी करीत आहेत. एमआयएमची उमेदवारी शेख यांना मिळाल्यास ती शिवसेनेचे कोठे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

Story img Loader