धवल कुलकर्णी
एखादं संकट आलं तर जात, पात, पंथ, धर्म, आणि राजकीय भूमिका याच्या पलीकडे जाऊन एकमेकांसाठी धावून जायचं असतं. खरंतर हा भेदाभेद एरवीसुद्धा असूच नये. करोनाचं संकट देशावर अक्षरश: टांगत्या तलवारीसारखा असताना दुर्दैवाने काही मंडळी हिंदू व मुस्लिम समाजात धार्मिक वितुष्ट निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. याबाबत अत्यंत प्रक्षोभक असे व्हिडीओ आणि मेसेज समाज माध्यमांवर पसरवले जात आहेत. या अशा अस्वस्थ करणाऱ्या काळात सुद्धा एका मुसलमानांचा पक्ष अशी सरळधोपट इमेज असलेल्या एका पक्षाचा नेता आणि खासदार काही हिंदू पुजाऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेला आहे.
करोनामुळे लादण्यात आलेल्या टाळेबंदीत मध्यप्रदेशातल्या विदिशा येथून औरंगाबादला २० तरुण साधूंचा जत्था काही धार्मिक विधी करण्यासाठी आला होता. टाळेबंदीमुळे या सगळ्यांचा परतीचा मार्ग बंद झाला. हे लोक बस घेऊन परत गावी जायला तयार असले तरीसुद्धा त्यांना इथल्या अधिकार्यांकडून परवानगी मिळत नाहीये आणि यांना मदत मिळावी व परत विदिशाला जायचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून झटत आहेत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएम औरंगाबादचे खासदार आणि माजी पत्रकार इम्तियाज जलील.
“काही दिवसांपूर्वी अशा साधूंना लातूरहून पुण्याला जायला एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मध्यस्थीनंतर परवानगी देण्यात आली. मग या वीस पुजाऱ्यांना परवानगी का देण्यात येत नाहीये? हे लोक बस भाडे तत्त्वावर घेऊन आपल्या गावी जायला राजी आहेत पण त्यांना योग्य त्या परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत. हा व्यवस्थेचा अडेलतट्टूपणा खरोखरच आक्षेपार्ह आहे,” असेही जलील म्हणाले.
जलील हे गृहमंत्री अनिल देशमुख आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी व पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याशी बोलले आहेत. मात्र अद्याप पर्यंत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. हे पुजारी औरंगाबाद मध्ये पैठण रोड ला राहणाऱ्या लक्ष्मीनारायण अटल या सनदी लेखापाल यांच्या घरी मार्च १८- १९ च्या दरम्यान धार्मिक विधी करायला आले होते. टाळेबंदीची घोषणा अचानक करण्यात आल्यामुळे त्यांना इथेच अडकून पडावे लागले.
“ते माझे पाहुणे असल्यामुळे मी त्यांची सोय केली आहे. त्यात काही अडचण नाही, पण खरा प्रॉब्लेम हा आहे की यांचे कुटुंबीय हे त्यांच्या गावी आहेत. हे पुजारी सर्वसामान्य आर्थिक स्तरातले असल्यामुळे त्यांचा व त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह त्यांनी केलेल्या पूजा अर्चेवर चालतो. ते इथे असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची तिथे ससेहोलपट होत आहे. काहींचे आईवडील म्हातारे आहेत आणि काहींची मुलं लहान,” असे अटल म्हणाले.
त्यांनी सांगितले की त्यांनी स्वतः औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना भेटून मी स्वतः खर्च करून त्यांना बस मधून त्यांच्या गावी पाठवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. तरीसुद्धा सरकारकडून अजूनही परवानग्या मिळालेल्या नाहीत.”हे सर्व पुजारी तरुण आहेत आणि त्यांना कुठलाही आजार नाही. त्यांना गावी पाठवण्यापूर्वी त्यांच्या तब्येतीची तपासणी सुद्धा करता येईल. सरकारने टाळेबंदीमधून खरोखर गरज असलेल्यांना पर्याय उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे,” असे अटल म्हणाले.