राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या आठ आमदारांनी एनडीएत प्रवेश करत ते महाराष्ट्रातल्या सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवारांसह आठ आमदारांनी रविवारी (२ जून) मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज (४ जून) छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान, एआयएमआयएमने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांच्या जुन्या भाषणांचे, मुलाखतींचे व्हिडीओ दाखवले, ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केले होते.
काही दिवसांपूर्वी तुम्हाला भ्रष्ट वाटणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसलात असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी भाजपा आणि शिंदे गटासमोर उपस्थित केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले की, ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांच्या दबावाखाली स्थापन झालेल्या सरकारचे अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने आम्ही व्यंगात्मक आंदोलन करत आहोत.
यावेळी इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. खासदार जलील म्हणाले की, हे जे आंदोलन आहे ते नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आहे. पाच दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं होतं. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक आरोप केले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यात सिंचन घोटाळा, बँक घोटाळा, खणन घोटाळ्यासह मोठी यादी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता मोदीजींनी सांगावं की, तुम्ही असा कोणता साबण वापरलात, अथवा कोणती डिटर्जंट पावडर वापरलीत आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसला आहात?
हे ही वाचा >> “शपथविधीनंतर शरद पवार म्हणाले परत फिरा, मी त्यांना…”, राष्ट्रवादीच्या आमदाराने सांगितलं ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?
इम्तियाज जलील म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आमची सत्ता आल्यावर आम्ही अजित पवारांना तुरुंगात पाठवू, त्यांना तुरुंगात चक्की पिसायला लावू, मग आता काय झालं की, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात?