BJP MP Ajit Gopchade on Eknath Shinde : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळालं आहे. मात्र, महायुतीच्या नव्या सरकारचं नेतृत्त्व कोण करणार याचा निर्णय मात्र महायुतीच्या नेत्यांना घेता आलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, महायुतीत पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपाने स्पष्ट केल्यानंतर शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तर थेट म्हणाले की मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आता दिल्लीतून होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याबाबतचा निर्णय घेतील. या सर्व घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरम्यान, “एकनाथ शिंदे यांनी मोठेपणा दाखवावा आणि भाजपासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करावा”, असं वक्तव्य भाजपाचे राज्यसभेतील खासदार अजित गोपछडे यांनी केलं आहे. “अडीच वर्षांपूर्वी आम्ही लहान भावाला सिंहासनावर बसवलं होतं. यावेळी जनतेचा कौल भाजपाला आहे. त्यामुळे शिंदे यांनी औदार्य दाखवून भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा रस्ता मोकळा करावा”, असं गोपछडे म्हणाले.

हे ही वाचा >> “लोकसभेतील पराभवानंतर आम्ही…”, ईव्हीएममधील घोटाळ्याच्या आरोपांवर भाजपा नेतृत्त्वाची पहिली प्रतिक्रिया

भाजपाचे खासदार गोपछडे काय म्हणाले?

खासदार गोतछडे म्हणाले, “ज्या पद्धतीने जनतेने आम्हाला कौल दिला आहे त्या दृष्टीने आम्ही यावेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. मागच्या वेळी आम्ही लहान भावाला सिंहासनावर बसवलं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्याने खूप प्रगती केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठा भाऊ असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. मागच्या वेळी मोठ्या भावाने लहान लहान भावाला सिंहासनावर बसवलं होतं. यावेळी एकनाथ शिंदे आणि मनाचं औदार्य दाखवावं आणि भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा करावा”.

एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा, बावनकुळे म्हणाले…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “एकनाथ शिंदे नाराज नाहीत. आम्ही महायुती म्हणून अभेद्य आहोत”. एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपद मागितल्याच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “मला त्याबाबतची माहिती नाही. याबाबतचा निर्णय आमचं केंद्रातलं नेतृत्व घेणार आहे.