पाडव्याच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत असतं. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना दिवाळीच्या निमित्ताने भेटले. अशात गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार आलेले नाहीत. यामागचं कारण सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
मी आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा देते. सगळ्यांचं हे वर्ष सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावो अशी प्रार्थनाही करते. महाराष्ट्रावर महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाचं सावट आहे त्यातून आपली मुक्तता होऊ दे एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार दिवाळीसाठी का अनुपस्थित?
“दादाला (अजित पवार) डेंग्यू झाला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मागचे २० ते २५ दिवस दादा (अजित पवार) कुठल्याच कार्यक्रमांना गेलेला नाही. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत. मला असं वाटतं की जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे. अर्धा ग्लास कधीही रिकामा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“माझ्यासाठी माझ्या माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येक जण आपली तब्बेत, जबाबदाऱ्या सांभाळतो आहे. आज रोहितही इथे आलेला नाही. तो संघर्ष यात्रेसाठी बीडला आहे रोहितचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.