सीताराम चांडे
शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चाना उधाण आले. विशेष म्हणजे काल, शुक्रवारी रात्रीपासूनच ते शिबीरस्थळी दिसले नसल्याचे सांगितले जाते. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनावेळीही अजित पवार यांनी असेच कार्यक्रमाचे व्यासपीठ सोडले होते.
काल उद्घाटनाच्या सत्रापासून शिबीरस्थळी सक्रिय असणारे अजित पवार आज मात्र दिवसभर न दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. विशेष म्हणजे गेले काही दिवस आजारी असलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असूनही मुंबईतील रुग्णालयातून थेट शिर्डीतील शिबिरासाठी काही काळ आले. मात्र अजित पवार त्याच वेळी शिबीरस्थळावर अनुपस्थित राहिले. ही चर्चा मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, प्रसारमाध्यमांनी गैरसमज पसरवू नये. अजित पवार शिबीर सोडून त्यांच्या आजोळी गेले असल्याचे स्पष्टीकरण दिले.
उत्सवी स्वरूपाने नाराज?
अजित पवार कालपासूनच अस्वस्थ होते. हे शिबीर ‘विचार मंथन’, संकटात सापडलेल्या शेतकरी, कष्टकरी यांना आधार देण्यासाठी, राज्यापुढील आव्हानांचा वेध घेण्यासाठी असे जाहीर केलेले असताना शिबिराला एखाद्या सोहळय़ाचे आलेले रूप यावरूनही ते नाराज होते. शिबिराचा हेतू काय आणि होत असलेल्या प्रदर्शनावरून त्यांनी संताप व्यक्त केला होता.