कराड : सध्या अनेक राजकीय आणि समाज नेत्यांमध्ये वाचाळवीर वाढलेत. यशवंतराव चव्हाणांची शिकवण आणि महाराष्ट्राची संस्कृतीही ‘आरेला कारे’ म्हणण्याची नाही, तरी वाचाळवीरांनी भान ठेवावे आणि आत्मपरीक्षणही करावे, असा सल्लावजा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.सध्या राज्यात मनोज जरांगे विरुद्ध मंत्री छगन भुजबळ असे वाकयुद्ध सुरू असल्याने पवारांचा हा सल्ला नेमका कुणाला याची चर्चा त्यांच्या विधानानंतर सुरू झाली आहे. दरम्यान, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वपक्षीयांच्या बैठकीत आणि राज्य मंत्रिमंडळानेही घेतला असल्याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी या वेळी आवर्जून केला.माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
पवार म्हणाले, की आपले वाचाळवीरांसंदर्भातील बोलणे हे कोणा एकाला डोळय़ासमोर ठेवून नसून, ते सर्व नेत्यांसाठी आहे. संविधानाने प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार दिला असलातरी या अधिकाराचा कसा वापर करायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आज आपण दररोज पहातोय कोणीतरी काहीतरीच वक्तव्य करतोय, हे बरोबर नसल्याची नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>केईएम रुग्णालयात रक्ततपासणीसाठी गर्भवती महिला तासन तास तिष्ठत
दोषींवर कडक कारवाई होणार
अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी या वेळी दिला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली- सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान, एक सप्टेंबर रोजी झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी प्रमुख संशयित आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरे या तरुणास पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह ताब्यात घेऊन अटक केल्यासंदर्भात विचारले असता पवार यांनी वरील इशारा दिला. ही दगडफेक आणि पोलीस लाठीचार्ज या संपूर्ण प्रकाराचा तपास कोणत्याही दबावात न येता केला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वपक्षीयांच्या बैठकीत आणि राज्य मंत्रिमंडळानेही घेतला असल्याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी या वेळी आवर्जून केला.