राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी सगळ्यांनीच तोलून मापून बोललं पाहिजे असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते बोलून जातात आणि मीडियाचे लोक आम्हाला त्याबाबत विचारणा करतात. मी माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही पण आम्हालाही विचारणा होते असं अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना माझं सांगणं आहे की तोलून मापून बोला. कुठल्या समाजाला राग येईल किंवा तो समाज आपल्यावर नाराज होईल असलं काही बोलू नका. आमच्याकडेही ते लगेच दांडकं घेऊन येतात, दादा तुमचं काय म्हणणं आहे? अरे बाबा थांबा ना जरा. मी उपमुख्यमंत्री असलो तरीही माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही
रोज नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा-अजित पवार
एक लक्षात ठेवा जिथे जिथे शेतकऱ्यांना मदत लागेल तिथे आम्ही महायुतीचं सरकार म्हणून तुमच्या पाठिशी आहोत. पण तुम्हालाही सांगणं आहे की तरुणांनो या कानाचं ऐकून त्या कानी सांगत बसू नका. तरुणांनी आपली संघटना मजबूत करण्यासाठी काम केलं पाहिजे. अशातूनच नेतृत्व तयार होत असतं. नेतृत्व काय आईच्या पोटातून कुणी शिकून येत नाही. आमचंही आता वय झालं तरीही रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. पदाधिकाऱ्यांनीही माझा कार्यक्रम हाणून पाडला वगैरे समजू नये. कुणीही कुणाचा कार्यक्रम हाणून पाडत नाही. असं काही हाणून पाडणं वगैरे डोक्यात आणू नका. साधू संतांनी काय सांगितलं आहे त्याचं आचरण करा, चांगला विचार करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी रहा. नाहीतर मग काही खरं नाही. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मी पुढच्या वेळी बीडच्या मान्यवर लोकांशी संवाद साधेन आणि अपेक्षा जाणून घेईन-अजित पवार
बीड जिल्ह्याच्या लोकांनी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पुढच्या वेळी मुक्कामाच्या तयारीने येईन. बीडमधली मान्यवर मंडळी डॉक्टर, वकील, इतर महत्वाचे लोक यांची बैठक मी पुढच्या वेळी घेणार आहे. त्यांना विचारणार आहे की तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे. मला तुम्हा सगळ्यांची साथ लागणार आहे. लोकांचं जे म्हणणं असेल तेदेखील आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. जे योग्य म्हणणं असेल तर त्याचं स्वागत आपण सगळ्यांनीच केले पाहिजे. मी जातो तिथे कलेक्टर, एसबी, सीओ सगळे अधिकारी हजर असतात. चांगल्या सूचना आल्या तर मी लगेच त्याबाबतच्या पुढील सूचना देईन. तु्म्हाला आज मी शब्द देतो की चुकीचं, निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार म्हणजे टाकणार. तो कंत्राटदार अजित पवारांच्या जवळचा असला तरीही.