विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (दि. २० डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले प्रस्ताव जोरकसपणे मांडले. त्यावर सरकारच्या मंत्र्यांनीही विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची भूमिका ठेवल्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शेवटच्या दिवशी विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यावरील चर्चा होत असताना सत्ताधाऱ्यांकडून विदर्भाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विरोधकांकडून विदर्भाचा प्रस्ताव यायला हवा होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर द्यायला उभे राहिले आणि त्यांनी जयंत पाटील यांना “आता हे धंदे बंद करा…”, असे जोरदार प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले जयंत पाटील?
विदर्भाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना जयंत पाटील म्हणाले, “विदर्भाचा विषय सत्ताधारी पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. अर्थमंत्र्यांनी काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले होते की, वेळ नसेल तर आम्ही सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव मागे घेऊ. दहा दिवसांच्या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांचे दोन प्रस्ताव, विरोधकांचा एक प्रस्ताव किंवा विरोधकांचे दोन प्रस्ताव आणि तुमचा एक प्रस्ताव, एवढे मर्यादित कामकाज का करायचे? त्यामुळेच महिनाभर अधिवेशन घ्या, नागपूरची हवा आम्हाला जास्त दिवस खाऊ द्या, असे आम्ही सांगत होतो.”
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उत्तर देण्यासाठी उभे राहत होते. तेव्हा जयंत पाटील म्हणाले, “माझे बोलणे संपलेले नाही. मला दोन मिनिटे द्या आणि दोघांपैकी कोणता उपमुख्यमंत्री बोलणार हे ठरवा.” मात्र अजित पवार चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, “आमचा चांगला समन्वय आहे. कुणी कसं बोलायचं हे आम्हाला चांगलं कळतं.”
हे धंदे आता बंद करा – अजित पवार
“काल कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा होत असतानाच कळले होते की, वेळ कमी आहे. विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. त्यावेळेसच विरोधकांना समजले होते, आता अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना तसे सांगायला हवे होते की, आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. इकडे वेगळे बोलायचे, बाहेर वेगळे बोलायचे, हे धंदे बंद करा”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जयंत पाटील यांना सडेतोड उत्तर दिले. म्हतारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय. विरोधी पक्षाला विदर्भात येऊन विदर्भाचा विसर पडावा, याचे अधिक दुःख वाटते. पण काही हरकत नाही. आम्ही विदर्भाला विसरणार नाही.